छापा मारत घोणसरीत हातभट्टी उध्वस्त

दारूसाठीचे रसायन आणि बॅरल केले नष्ट

कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील घोणसरी टेबवाडी येथे नदीलगत हातभट्टीची अनधिकृत दारू काढून त्याची विक्री होत असल्याबद्दल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या छाप्यात सुमारे 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

मात्र यात संशयित आरोपी जोसेफ सालु रइस हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला. याबाबत पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिस नाईक रुपेश गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दाखल फिर्यादीनुसार घोणसरी टेबवाडी येथील जंगल भागात हातभट्टीची दारू काढून ती विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार किरण मेथे, कैलास इम्पाळ हे या हातभट्टी सुरू असलेल्या त्या नदीकाठी गेले.

त्यांना पाण्याचा बुडबुडा असा आवाज आला, त्यामुळेच त्यांनी छुप्या पावलांनी जात पाहिले तेव्हा नदीकाठी चुलीवर पत्र्याचे बॅरल लावून त्यातून हातभट्टीची दारू काढली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांचा सुगावा लागताच जोसेफ सालु रइस तिथून जंगलमय भागातून पसार झाला. यावेळी पोलिसांना तिथे सुमारे 400 रुपये किमतीची दारू, प्लास्टिक कॅन, 100 लिटर रसायन व बाजूच्या झाडीमध्ये पाच बॅरल मध्ये असलेले सुमारे 20 हजार किमतीचे 1 हजार लिटर रसायन, 200 रुपये किमतीचा ॲल्युमिनियम टोप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बॅरल मधील रसायन व बॅरल, प्लास्टिक कॅन जाळून नष्ट करण्यात आली अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page