पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे …

भंडारी ए.सो. हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत यांचे प्रतिपादन

मालवण ता.१८-:* दृष्टी आड झालेल्या सृष्टीचे महत्व मानवाला न समजल्याने तसेच मानवाच्या चंगळवादी आणि विलासी वृत्तीमुळे आज मोठ्या प्रमाणावर जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी पर्यावरण संतुलन बिघडल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. आणि म्हणूनच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन भंडारी ए. सो. हायस्कुल मालवणचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी हायस्कुलमध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत पर्यावरण पूरक होळी तसेच जागतिक वन दिन संयुक्त रित्या साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. खोत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल प्रकाश शिंदे, वन रक्षक अश्विनी लोखंडे, सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी अवसरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना वामन खोत म्हणाले, होळी किंवा रंगपंचमी खेळण्यासाठी रसायन मिश्रित रंगाचा वापर केला जात असल्याने ते रंग मानवी आरोग्याला अपायकारक आहेत. त्यामुळे रासायनिक रंगापासून दूर राहताना नैसर्गिक रंग बनविण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आज पृथ्वीवर ३३ टक्के जंगल असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात २१ टक्के जंगल शिल्लक राहिले आहे. ही सर्वांची काळजी वाढविणारी गोष्ट आहे. होलिकोत्सवात आंब्याचे झाड दहनासाठी वापरले जाते. त्याचा परिणाम आज रायवळ व तत्सम आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे. या व्यतिरिक्त हापूस आंब्यावरही परिणाम झाला आहे. होलिकोत्सवात आंब्याचे झाड न वापरता त्याची फांदी वापरल्यास आंबा वृक्षाचा संहार टळेल. यावेळी प्रकाश शिंदे, अश्विनी लोखंडे यांनी वृक्षांचे महत्व पटवून दिले. तर सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रशालेला वृक्ष भेट देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. शेवटी श्री. अवसरे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page