सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी हानी
कणकवली ता.१६-:* स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक, शिक्षण प्रेमी, सिंधुदुर्ग जि.प.चे माजी सदस्य,जांभवडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र नाटेकर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. राम महेंद्र नाटेकर यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी हानी निर्माण झाली आहे .सोनवडे घाट मार्गाचे प्रणेते म्हणून प्रा. नाटेकर यांची ओळख होती.प्रा. नाटेकर यांच्यावर गुरुवार 17 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महेंद्र नाटेकर त्यांची तब्येत गेल्या काही दिवसापासून खालावली होती त्यांच्यावर पडवे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते त्यानंतर काल त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते मात्र आज दुपारी आज्ञा सुमारच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संदीप नाटेकर, सून डॉ. प्रतिमा नाटेकर मुलगी डॉ.सई लळीत, जावई माजी माहिती संचालक सतीश लळीत यांच्यासह नातवंडे असा परिवार आहे महेंद्र नाटेकर यांचा जन्म वडाचे पाट ता. मालवण या खेडेगावात झाला. जन्मगावी चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आजोळी ‘सातेरी मांड’ येथे त्यांनी स्थलांतर केले. त्यांचे मामा लोकांना होडीत बसवून ने-आण करण्याचे काम करीत. महेंद्र त्या कामात मामांना मदत करीत असत. १९४४ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
अभ्यासाप्रमाणे ते खेळातही आघाडीवर असत. वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत सर्व बक्षिसे पटकावित असत. सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे हे त्यांचे वर्गमित्र. त्यांच्या सुसंस्कारांचा व सुंदर वळणदार हस्ताक्षराचा महेंद्रावर अतिशय चांगला परिणाम झाल्याचे ते स्वतः नमूद करतात. पुढे वाणिज्य विभागात प्रवेश घेऊन ‘कॉलेज ऑफ कॉमर्स तथा गोखले महाविद्यालय, कोल्हापूर’ येथे त्यांनी आपल्या करियरला सुरुवात केली. शिक्षण घेत असतानाच त्यांना सॉर्टरची नोकरी मिळाली. गोखले महाविद्यालयामध्ये असताना तेथील मराठी, हिंदी वाङ्मय मंडळे, क्रीडा, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन निवडणुका यामध्ये त्यांनी सक्रीय भाग घेत यश संपादन केले.
८ जून १९६४ पासून ‘प्रागतिक माध्यमिक विद्यालय’, मालवण येथे महेंद्र नाटेकरांनी शिक्षकी जीवनाची सुरुवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या चारही भाषा ते शिकवित. १९६७ मध्ये संस्थेने प्रतिनियुक्तीवर त्यांना बी.एड. महाविद्यालय सांगली येथे पाठविले. बी.एड. परीक्षा झाल्यानंतर ते पुनश्च शाळेत रुजू झाले. विद्यालयाचा अकरावीचा निकाल २० टक्क्यापर्यंत खाली आला होता. हा निकाल वाढविण्यासाठी, शाळा सुरू होण्यापूर्वी सुट्टीच्या दिवसात अधिक तास घेऊन अध्यापन करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांकडून पाच-सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. भरपूर लिखाण करुन घेतले. त्यामुळे शाळेचा एकूण चांगला निकाल लागला. नाटेकर हे अतिशय शिस्तप्रिय व उत्तम अध्यापक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. १९७१ मध्ये त्यांनी एम.ए. केले. त्याचबरोबर बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळातही प्रावीण्य मिळविले.
यानंतर त्यांची कणकवली महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सकाळचे महाविद्यालय करून स्वखशीने दुपारी महाविद्यालयामध्ये ९ वी, १० वीला ते हिंदी शिकवित. महाविद्यालयात हिंदी प्राध्यापकाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हिंदी विषय घेऊन एम. ए. केले.
त्याचवेळी हिंदी विषय घेऊन पण इंग्रजी विषय सोडून एस.एस.सी. झालेल्या १०० प्राथमिक शिक्षकांना इंग्रजी शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला. या सर्व शिक्षकांची प्रारंभापासून तयारी घेत एका वर्षात एस.एस.सी. उत्तीर्ण केले. त्यासाठी त्यांनी रात्री सात ते नऊ या वेळात त्यांचा अभ्यास घेतला. म्हणजेच सकाळी महाविद्यालय, दुपारी शाळा व रात्री इंग्रजी शिकवणी असे कार्य चालू होते. हे रात्रीचे वर्ग एकही पैसा न घेता नाटेकरांनी शिकविले.
कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्यपद सोडल्यानंतर त्यांना न्यू इंग्लिश स्कूल, कळसुली येथे मुख्याध्यापक म्हणून नोकरी मिळाली. हे गाव कणकवलीपासून दहा कि.मी. वर आहे. येथील शाळेची अवस्था चांगली नव्हती. येथील प्रशालेचा कारभार शिस्तबद्ध व्हावा, शैक्षणिक दर्जा सुधारावा, बोर्डाचा निकाल जास्तीत जास्त लागावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचबरोबर शिक्षकही चांगले चारित्र्यसंपन्न व्हावे व शाळेबरोबरच परिसराचाही विकास व्हावा यासाठी त्यांनी आवश्यक ते कठोर निर्णय घेतले. शिक्षक, लेखनिक, शिपाई यांच्यासाठी आचारसंहिता तयार करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली. कळसुलीचा निकाल जो जेमतेम ४०-५० टक्के लागत असे तो १००टक्के लागला. यानंतर १९७४ पासून ते जांभवड्याच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. या शाळेची अवस्था तर फारच बिकट ह
