उद्या होणार भूमिपूजन :नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती..
कणकवली ता.१४-: कणकवली नगरपंचायतीच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ साकारण्यात येणार असून, या उद्यानाचे भूमिपूजन उद्या सोमवार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निम्मेवाडी व सुतारवाडी परिसरातील नगरपंचायतीच्या आरक्षित ८.५ गुंठे जागेत हे उद्यान उभारण्यात येणार आहे. शहर विकास आघाडीला विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नेतेमंडळींना तसेच नागरिकांना भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नगराध्यक्ष पारकर म्हणाले की, उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळ साहित्य, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, योगाभ्यासासाठी स्वतंत्र जागा तसेच छोटेखानी व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासह आरोग्यदायी उपक्रमांसाठी उत्तम सुविधा मिळतील. या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याबरोबरच शहरातील विकासकामांनाही अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्यानाचा लाभ निम्मेवाडी, सुतारवाडी, बांधकरवाडी, सिद्धार्थनगर, माऊलीनगर तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना होणार आहे. भूमिपूजनानंतर इतर विकासकामांनाही प्रारंभ होणार असल्याचे पारकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, जाई मुरकर तसेच तेजस राणे, निकेत मूरकर, प्रसाद अंधारी, रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.
