⚡बांदा ता.१४-: गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या गोवा परिवहन मंडळाच्या (कदंबा) बसमधील एका विवाहित महिलेला अचानक आकडी आल्याने ती अत्यवस्थ झाली. चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत बस बांदा येथील श्रीराम चौकात थांबवली. यावेळी मनसेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत महिलेला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारानंतर रात्री उशिरा तिला घरी सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथील संबंधित महिला नोकरीनिमित्त दररोज गोवा-सावंतवाडी मार्गावर प्रवास करते. शुक्रवारी सायंकाळी कामावरून परतत असताना गोव्याहून सावंतवाडीकडे येणाऱ्या कदंबा बसमध्ये प्रवासादरम्यान तिला अचानक आकडी आली. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मनसेचे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तातडीने श्रीराम चौक येथे धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेला तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तसेच तिच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नातेवाईक बांद्यात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी आवश्यक उपचार केल्यानंतर महिलेला रात्री उशिरा घरी सोडण्यात आले.
चालक, वाहक, स्थानिक नागरिक तसेच मिलिंद सावंत यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
कदंबा बसमधील महिलेला आकडी; मनसे तालुकाप्रमुखांच्या तत्परतेने मिळाले उपचार…
