मुलांच्या भावनिक गरजांचा विचार करा – मधुरा आजगांवकर

वेंगुर्ला ता.१३-:* आपल्या अपेक्षा पालकांनी मुलांवर न लादता मुलांच्या भावनिक गरजा काय आहेत याचा विचार करणे फार गरजेचे आहे. अशावेळी समुपदेशकाची निवड करुन योग्य ते मार्गदर्शन घ्यावे असे प्रतिपादन पुणे येथील मल्टीनॅशनल कंपनीत एच.आर.म्हणून कार्यरत असलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या मधुरा आजगांवकर हिने केले.

वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचातर्फे दरवर्षी भाषादिन, महिलादिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे आयोजन केले जाते याहीवर्षी हा सावित्रीबाई फुले स्मृती जागर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कु. आजगांवकर बोलत होती. सद्यस्थितीत शिक्षण आणि व्यवसायातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागते. ते या स्पर्धेला आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देतात त्यांच्याबाबत समस्या कमी आढळतात. परंतु, ज्यांच्याजवळ आत्मविश्वास आणि धैर्ये कमी असते अशांच्याबाबती उद्भवणा-या समस्या गंभीर रुप धारण करु शकतात असेही आजगांवकर म्हणाली. या कार्यक्रमाला मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, महिला मंचच्या अध्यक्षा संजना तेंडोलकर, सदस्य दिव्या आजगांवकर, साक्षी वेंगुर्लेकर, स्वाती बांदेकर, मंजिरी केळजी, संध्या करंगुटकर, निलम रेडकर, माहेश्वर गवंडे, रिया केरकर, रुपा शिरसाट यांच्यासह किरातच्या संपादक सीमा मराठे उपस्थित होते.

सीमा मराठे व मधुरा आजगांवकर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर महिला मंचतर्फे सावित्रीबाईंची ओवी गाऊन त्यांना मानवंदना देण्यात आली.

व्यक्तिमत्व विकास ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी पालकांनी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत. मुलांच्या समस्या हाताळणे ही कौशल्याची बाब आहे. म्हणून नेमकी समस्या काय आहे हे कळणे आणि पालकांमध्ये सुजाणपणा असणे फार महत्त्वाचे असल्याचे मंगल परुळेकर यांनी सांगितले.

मधुरा आजगांवकर हिने पालकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या यात सहभाग घेऊन समस्यांचे निराकरण केले.

You cannot copy content of this page