माणगाव येथे अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी ता.१३:* श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगाव येथे एकपात्री अभिनय स्पर्धा झाल्या. माणगाव पंचक्रोशीतील विविध शाळेतील ३५ स्पर्धकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे परीक्षण नाट्यर्मी पांडुरंग कोंडोसकर व डाॅ. दत्ता शिरसाट यांनी केले.

तिसरी ते चौथीच्या गटात प्रथम क्रमांक कुमारी वैभवी अमित मुंज, द्वितीय सिद्धी सुधीर गावडे, तृतिय प्रांजली संजिव चौरे, उत्तेजनार्थ हर्षीता योगेश राणे. पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक सिद्धी जामदार, द्वितीय करिना किरण मुंज, तृतिय दिव्या चंद्रशेखर मेस्त्री, उत्तेजनार्थ जतीन प्रसाद गुरव. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक पर्णवी मोहन पाटकर, द्वितीय शर्वरी अण्णासाहेब काशिद यांनी पटकावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव एकनाथ केसरकर यांनी केले. पांडुरंग कोंडोसकर व डाॅ दत्ता शिरसाट यांनी मुलांना आपले बोलणे आणि त्या अनुषंगाने होणारे शारिरीक हावभाव म्हणजेच अभिनय आहे. बोलणे आणि हावभाव यांचा ज्याला योग्य ताळमेळ घालता येतो तो उत्कृष्ट अभिनय करु शकतो, अशा आशयाचे मार्गदर्शन केले.

संस्थाध्यक्ष परशुराम चव्हाण यांनी अभिनय ही एक कला असून निरीक्षणाने ती समृद्ध होते. मुलांनी आपली निरिक्षण शक्ती वाढवावी, असे मनोगतात सांगितले. यावेळी संचालक विजय पालकर, शाम पावसकर, सदाशिव पाटील, दादा कोरगावकर, विजय केसरकर, दिपक काणेकर शिक्षक पालक व वाचनालयाचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मुलांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा विविध विषयांवर आपल्या अभिनयातून आपली कला सादर केली. अभिनय ही स्वत:ला आणि इतरांना आनंद देणारी कला आहे. तिची जोपासना होणे ही काळाची गरज आहे. मुलांच्या विविध कलांना माणगावचे वाचनालय व्यासपीठ मिळवून देत आहे. कै ऋषिकेश नाईक यांच्या स्मरणार्थ राजन नाईक व गोपाळ सावंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती.

You cannot copy content of this page