स.का.पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचे प्रतिपादन…
मालवण दि प्रतिनिधी समाजातील बदलती परिस्थिती व वास्तवाची जाण प्रत्येक मुलीने ठेवून आपल्यातील संवेदनशीलता, सृजनशीलता व भावनिकतेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आजच्या मुलींनी प्रत्येक बाबतीत समर्थ असणे आवश्यक असून मुलींनी महिला म्हणून नाहीतर माणूस म्हणून जगले पाहिजे असे प्रतिपादन मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२५ वर्षपूर्ती निमित्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण शहर आणि परिसरातील महिला मुख्याध्यापिकांचा सत्कार सोहळा मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
त्यावेळी डॉ. सामंत या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत , कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, कातवड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीतल चव्हाण, वायरी बांध शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेहा तांबे, रघुनाथ देसाई स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. मधुचंदा वस्त, देऊळवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी सामंत, धुरिवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली ढोलम, रेवतळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी देशमुख, दांडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विशाखा चव्हाण, वायरी भूतनाथ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा पुजारे, घुमडे शाळेच्या उपशिक्षिका सौ. सरिता नाईक आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी. जी. मेस्त्री यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तर प्रफुल्ल देसाई यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना डॉ उज्वला सामंत म्हणाल्या, पालकांनी मुलगी हा माझा स्वाभिमान आहे असे समजून मुलींना वाढविले पाहिजे. आजच्या मुलींनी प्रत्येक बाबतीत समर्थ असणे आवश्यक असून मुलींनी महिला म्हणून नाही तर माणूस म्हणून जगले पाहिजे असे सांगून डॉ सामंत म्हणाल्या आज मुली मुलांपेक्षा जास्त गुण मिळवत असून मुलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. घरातील प्रत्येक जबाबदारी सांभाळताना महिला प्रामाणिक पणे काम करतात.
समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपल्याला मुलगी आहे याची पालकांना कधीही लाज वाटू नये. मुलींना शिक्षण देतानाच प्रत्येक कामही मुलींना शिकविले पाहिजे. एक मुलगी दहा जणांना भारी पडेल असे शिक्षण देण्याची व कर्तृत्व दाखविण्याची संधी पालकांनी मुलीला दिली पाहिजे. महिलांनी समाजात होणारे बदल, समाजकारण बदलते शिक्षण व इतर विषयांवर आपले मत मांडले पाहिजे. जे काम करतोय त्यात महिलांनी समर्थ असणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही जी खोत यांनी महिला दिनाचे महत्व स्पष्ट केले शेवटी सौ संजना सारंग यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा वराडकर यांनी केले यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनीनी महिला दिनाचे महत्व करणाऱ्या रांगोळी तसेच भारतातील कर्तृवशालिनी महिलांच्या व्यक्तिरेखा स्पष्ट करणारी भित्तीपत्रकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते
