*💫बांदा दि.०८-:* गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी संध्याकाळपासून ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्रभर लागला. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने नागरिकांची तारांबळच उडाली. अतिवृष्टीतून वाचलेले भातपिक तसेच फवारणी केलेल्या आंबा, काजू बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. गुरूवारी संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची धाकधुक वाढली. मळणी करून ठेवलेले गवत पूर्णपणे भिजल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती किड रोगांसाठी पोषक ठरत आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. आंबा बागायतीवर दोन वेळा केलेली फवारणी काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली. ढगाळ वातावरणाचा फटका आंब्याच्या मोहरावर होत आहे. तुडतुडा, फळमाशी, किड यांचे प्रमाण वाढले आहे. सरकारने आम्हाला थोडीफार तरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी न्हावेली-रेवटेवाडी येथील आंबा बागायतदार सुनिल परब यांनी केली आहे. नोकरी नसल्याने मोठ्याप्रमाणात शेती केली. परंतु अतिवृष्टीमुळे आमच्या हाती 50 टक्केच पिक लागले. मळणी करून ठेवलेले गवत कालच्या पावसात भिजल्याने आमचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने आम्हाला भरपाई देण्याची मागणी पाडलोस येथील शेतकरी अमोल नाईक यांनी केली आहे.
मडुरा पंचक्रोशीत चार तास बरसला अवकाळी पाऊस…!
