सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ ही मोहीम राबविण्यात आल्यानंतर आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास प्रारंभ करण्यात आला.
जिल्ह्यातील प्रसिद्ध कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथून यास प्रारंभ झाला आहे. लोकांसाठीच्या योजना सोप्या आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यंत लवकर पोहचतात. पद्मश्री प्राप्त परशुराम गंगावणे व चेतन गंगावणे यांच्या विश्राम ठाकर अदिवासी कला अंगण ट्रस्टच्या माध्यमातून नाधवडे येथे कळसुत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमाने या मोहिमेचा शुभारंभ आज झाला.
शाहीर कल्पना माळी आणि चैतन्य महिला विकास मंडळाच्या माध्यमातून निवडक मोठ्या गावांमधून गर्दीच्या ठिकाणी विशेषतः बाजाराच्या ठिकाणी लोककलेच्या या कार्यक्रमास आजपासून प्रारंभ झाला आहे. तौक्ते वादळातील नुकसान भरपाई, मच्छिमारांचा डिझेल परतावा योजना, फळझाड लागवड योजना, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पीक कर्ज योजना, वैद्यकीय महाविद्यालय, शिवभोजन थाळी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना, एक शेतकरी – एक अर्ज महाडीबीटी पोर्टल अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे. जिल्ह्यामध्ये आजपासून प्रारंभ झालेल्या या जागराचा नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
