मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
*💫बांदा दि.०८-:* बांदा-शिरोडा मार्गावरून दांडेली-पाडलोस-मडुरा मार्गे शेर्ले धावणाऱ्या मायनिंग वाहतूक करणारे रिकामी डंपर बेदरकार धावत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच वाहतूक थांबवावी अन्यथा वाहतूक पूर्णपणे रोखण्यात येईल, असा इशारा मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे. मुळातच बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक अपघातही घडले आहेत. पूर्वी भिंती रंगविण्यासाठी वापर करत असलेली माती सद्यस्थितीत शेर्ले तिठा ते शेर्ले तांबळघाटी दरम्यान रस्त्याच्या बाजूला पसरविण्यात येते ती योग्य आहे काय असा सवालही नागरिकांमधून होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बांदा-शिरोडा मार्गावर अगोदरच अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी सुसाट धावणाऱ्या रिकामी डंपरांना वेळीच ब्रेक लावणे आवश्यक आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन अन्य वाहतूक निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
