अंगणवाडी सेविकांचे सलग तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता ०९ राज्य शासनाने अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने ७ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाख़ाली ७ ते १० मार्च या कालावधीत आंदोलन करण्याचा निर्णय घेत सुरु केलेल्या या धरणे आंदोलनात पहिल्या दिवशी वैभववाडी व देवगड तालुक्यातील अंगणवाड़ी कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी झाले होते. तर दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी कुडाळ व मालवण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

आंदोलनाच्या आजच्या तीसऱ्या दिवशी सावंतवाड़ी व दोडामार्ग तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी महाराष्ट्र राज्य महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि त्याने एकत्रित चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरविला त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविणे आणि त्यांना इतर सुविधा देणे या कार्यक्रमाला अग्रस्थान दिले आहे. दोन वर्षे कोरोना महामारीने जनतेला व सरकारला वेठीस धरले. म्हणून आम्ही अंगणवाडी कर्मचारी सामाजिक जबाबदारी म्हणून या सरकारवर आर्थिक बोजा वाढणार हे लक्षात घेऊन या मागण्या केल्या नाही. मात्र २०१५ ला राज्य सरकारने मानधनात वाढ केली त्यानंतर गेली पाच वर्षे कोणतीच वाढ केलेली नाही. त्या तुलनेत महागाई तिपटीने वाढली आहे .

कोरोनाने घरातील अनेक कर्त्या पुरुषाची नोकरी गेली आहे. अन्न सुरक्षा योजनेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रास्तधान्य बंद केले आहे. मदतनीस वर्षाला ५४ हजार मानधन घेऊन चार व्यक्तींच्या कुटुंबाचे घर, मुलांचे शिक्षण व आजारपण कसे काय निभावणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने महाराष्ट्रभर मानधन वाढ, पेंशन, आहार दर वाढविणे, नवीन मोबाईल देणे यासाठी ११ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची शासनाला आठवण करून द्यावी, यासाठी आंदोलने सुरू केली आहेत.

त्याचाच भाग म्हणून ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज तीसऱ्या दिवशी सावंतवाड़ी व दोडामार्ग तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी शेकड़ोंच्या संखेने सहभागी झाल्या आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोठं मोठ्याने घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणानून सोडला. यावेळी ‘मानधन नको, वेतन हवे’, ‘भाऊबीज नको,बोनस हवा’, ‘मानधन वाढ आणि पेंशन मिळालीच पाहिजे’ अशा विविध घोषणा देत जिल्हा प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले.

You cannot copy content of this page