पुरातन मंदिरे बांधकामाचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील विद्यार्थी सिंधुदुर्गात

मडुरा, रोणापाल गावात पाच दिवसीय अभ्यास दौरा सुरु

बांदा ता.०९-:* बांद्रा – मुंबई येथील एल. एस. रहेजा स्कूल अॉफ आर्किटेक्चरचे सुमारे ८० विद्यार्थी प्रात्यक्षिक शिक्षणासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. सध्या मडुरा व रोणापाल गावात अभ्यास दौरा सुरु आहे. या पाच दिवसीय शिबीरात गावातील पुरातन मंदिरे, मंदिरांची रचना, गावाची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करुन त्यासंदर्भात पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रोफेसर आर्किटेक्ट अरविंद खानोलकर यांनी दिली.

बॉम्बे सब अर्बन आर्ट अँड क्राफ्ट एज्युकेशन सोसायटीच्या एल. एस. रहेजा स्कूल अॉफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी मडुरा व रोणापाल गावातील मंदिरात दाखल झाले आहेत. या पाच दिवसीय शिबीरात मंदिरांची माहिती, मंदिर बांधकाम आराखडा, माहिती संकलन, दस्तऐवजीकरण, चित्र रेखाटन व स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ही सर्व माहिती संकलित करुन त्यासंदर्भात पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थी गावात घरोघरी फिरुन ग्रामस्थांशी संवाद साधताना दिसत आहेत. मातीची घरे, लाकडी कौलारु छप्परे, ग्रामस्थांचे राहणीमान, बोलीभाषा, आहार याबाबत अभ्यास करीत आहेत.

यात मुंबईसह देशभरातील विद्यार्थी सहभागी आहेत. यावेळी प्रा. अरविंद खानोलकर म्हणाले, दक्षिण कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. मातीची घरे, लाकडी छप्पर, मातीचे अंगण, खोल्या हा प्रकार केवळ ग्रामीण भागातच पहायला मिळतो. शहरात सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण व फरशीकरण झालेले आहे. कोकणातील संस्कृती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही.

कोणतीही पदवी न घेता दोनशे – तीनशे वर्षांपूर्वी मातीची केलेली बांधकामे आजही सुस्थितीत आहेत. याचाच अभ्यास विद्यार्थी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रा. सचिन प्रभू म्हणाले, कोकणातील निसर्गसंपन्नता पाहून विद्यार्थी भारावून गेले आहेत. वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिर व आकेरीच्या रामेश्वर मंदिराला यापूर्वी भेट दिली. पुरातन मंदिरांची मातीची बांधकामे हा खरोखर अभ्यासाचा भाग आहे. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे भरपूर आहे असे ते म्हणाले. या विद्यार्थ्यांना प्रा. अरविन्द खानोलकर, सचिन प्रभू, नीता सरोदे, श्रद्धानंद नारकर, श्रद्धा पाळंदे, गार्गी कर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page