खास. विनायक राऊत;सावंतवाडीत कृतज्ञता सोहळा उत्साहात
*⚡सावंतवाडी,ता.०६-:* ज़िल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याचे सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. यात आलेले अडथळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच पार करता आले. आता त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी जेवढे प्रयत्न करण्यात आले. तेवढीच ताकत ते होऊ नये, यासाठी विरोधकांनी लावली. मात्र या सर्वावर मात करून आम्ही जिल्हा वासियांचे स्वप्न साकार केले, याचा अभिमान आहे. असेही ते यावेळी म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने याठिकाणी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जेष्ठ नेते विकास सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, अशोक दळवी, नागेंद्र परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, सीमा मठकर, रुची राऊत, इफ्तिकार राजगुरू, देवा टेमकर, अच्युत भोसले, डॉ.संजीव लिंगवत, अफरोज राजगुरू, डॉ.राजेश नवांगुळ, प्रवीणकुमार ठाकरे, रवी जाधव आदींसह मोठ्या संख्येने कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.शामराव सावंत यांनी केले. श्री.राऊत पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्यातील राजकारणाला सिंधुदुर्गवासिय बळी पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडले गेले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणावर प्रेम असल्यामुळे त्यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आणि तो अखेर मार्गी लावला, असे ते म्हणाले. तर या महाविद्यालयाला मान्यता देण्यासाठी आलेल्या केंद्रीय तपासणी पथकाकडून वारंवार त्रुटी काढण्यात आल्या. मात्र येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी “त्या” त्रुटी तात्काळ दूर केल्या. हे महाविद्यालय होण्यासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. तर कृती समितीने सिंहाचा वाटा उचलला, असेही भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले, मी आतापर्यंत चार चॅलेंज स्वीकारले आणि ते पूर्णही केले. त्यात पहिला माडखोल खोऱ्यात हत्ती हटाव मोहिम, चिपी एअरपोर्ट, आणि आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्न मार्गी लावला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आता या ठिकाणी सुरू झालेल्या महाविद्यालयात दहा ते बारा मार्च पाच पासून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देश पातळीसह महाराष्ट्रातील विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिक्षणासाठी येतील. त्यांना कोणती समस्या येऊ नये, म्हणून उर्वरित पायाभूत सुविधा निर्माण करूया, त्यासाठी लोकप्रतिनिधींसह वैद्यकीय अधिकारी व जिल्हावासीयांना पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
