राज्यात त्रिपक्षीय आघाडी सरकार किती दिवस टिकणार आहे ? – चंद्रकांत पाटील

*💫कणकवली ०८-:* ६ महिन्यांपूर्वी कृषी विधेयक संमत झाले. मग ६ महिने विरोधक झोपले होते काय ? असा परखड सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवली येथील कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत विचारला. मूठभर शेतकऱ्यांना हाताशी धरून विरोधक आपल्या राजकीय फायद्यासाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत. केवळ मोदींना विरोधासाठी आंदोलनाचे राजकीय भांडवल केले जात असल्याची टीकाही पाटील यांनी केली. आम्ही बोललो की आम्हाला विरोधक ट्रोल करतात, जरा राणेंना ट्रोल करून बघा ..अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.पंजाब व्यतिरिक्त महाराष्ट्र्रासह देशात अन्य कुठेच कृषी विधेयकाला विरोध केला नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांना शेतीतले काहीच कळत नाही म्हणून ते आंधळा विरोध करताहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी विधेयकाच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रात २०१७ सालीच असा कायदा आणला आहे. काँग्रेस सरकारने त्याआधी ३ वेळा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना जमले नाही. शेतकऱ्यांना एपीएमसी च्या बाहेर जास्त दराने शेतमाल विक्री करता येत आहे. एपीएमसी कुठेही बंद होणार नाही. कारण कृषी उत्पन्न वाढतेच आहे. ६० वर्षावरील शेतमजुरांना दरमहा ३ हजारांची पेन्शन मोदी सरकारने सुरू केली आहे. मागील ५ वर्षांत ५ हजार कोटी कृषीविमानुकसानभरपाई दिली. शेतकऱ्यांच्या मनात मोदी यांची आपला भाग्यविधाता ही प्रतिमा आहे. त्यामुळेच २०१४ साली २८२ खासदार तर २०१९ मध्ये ३०३ खासदार आहेत. सध्या ५५ असलेले खासदार भविष्यात ५ वर येतील. २०२४ मध्ये भाजपाला ४०० जागा मिळून ३ चतुर्थांश बहुमत भाजपाला मिळेल ही भीती राजकीय विरोधकांना आहे. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. राज्यात त्रिपक्षीय आघाडी सरकार किती दिवस टिकणार आहे ?. हिम्मत असेल तर एकेकटे लढा असे पाटील यांनी महाविकास आघडीला आव्हान दिले.

You cannot copy content of this page