आमदार नितेश राणे : वैभववाडीत स्वस्त दरात आटाचक्की आणि वॉटर प्युरिफायर चे दालन सुरू
वैभववाडी ता.२८-:* वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. जनतेने भाजपाकडे एक हाती सत्ता दिली आहे. मागील पाच वर्षापेक्षा पुढील काळात प्रभावी काम भाजपाचे नगरसेवक करतील. एकजुटीने सांघिक काम करून नगरसेवक आदर्श शहर बनवतील. त्याचबरोबर आता हक्काचा आमदार जिल्हा बँकेत संचालक आहे. त्यामुळे रोजगार उभारण्यासाठी युवकांना जिल्हा बँकेचे दालन कायम खुले असेल, यापुढील काळात जिल्हा बँकेत युवकांच्या नोकरीचा विषय असो वा अन्य विषय हे आमच्या सूचनेनुसारच होतील. असे परखड मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडीत स्वस्त दरात आटाचक्की आणि वॉटर प्युरिफायर चे दालन सुरू झाले आहे. याचा शुभारंभ व वस्तूंचे वाटप नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. भाजपा कार्यालयमध्ये सवलतीच्या दरात या वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दि. 1 मार्च ते 12 मार्च पर्यंत या वस्तू वैभववाडीत उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा बँकेच्या संचालक पदी आमदार नितेश राणे यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडी भाजपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नितेश राणे म्हणाले, स्वस्त दरात गृहपयोगी वस्तू वाटप करण्याचे काम भाजपाच्या वतीने जिल्हाभर सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी देखील मालवण व कुडाळ मध्ये या वस्तू पुरविल्या आहेत. भाजपाचे नियोजनबद्ध काम असल्यामुळेच वैभववाडीत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पार पडलेल्या निवडणुकीत शहरवासीयांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी वर विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक प्रामाणिक काम करतील, मागील पाच वर्षापेक्षा पुढे प्रभावीपणे काम सर्व नगरसेवक करुन दाखवतील असा विश्वास व्यक्त करत सांघिक कामातून आदर्श शहर बनवतील असे राणे यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या संचालक पदी भाजपाचे दिलीप रावराणे विजयी झाले आहेत. त्याच बरोबर तुमचा दुसरा हक्काचा संचालक आता मी आहे. जिल्हा बँकेच्या योजनांचा पुरेपूर लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सहकार्य मिळेल. रोजगार उभारण्यासाठी कर्ज पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर जिल्हा बँकेत नोकरी किंवा अन्य विषय पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार होणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, शारदा कांबळे, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, हर्षदा हरयाण, नगरसेविका संगीता चव्हाण, रेवा बावधाने, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, सुंदरा निकम, नगरसेवक रोहन रावराणे, राजन तांबे, डॉ. राजेंद्र पाताडे, बबलू रावराणे, नवलराज काळे, बाबा कोकाटे, बाळा हरियाण, किशोर दळवी, रितेश सुतार, सुनील भोगले, बंधू वळंजू, बाळा वाडेकर, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, अवधुत नारकर, शरद कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले. फोटो – वैभववाडी येथे आटा चक्की व वॉटर प्युरिफायर चे वाटप करताना आमदार नितेश राणे. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक.
