तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत इमारतीचे २ रोजी लोकार्पण

मालवण ता.२८-:* पर्यटन दृष्ट्या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तारकर्ली- काळेथर गावच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि. २ मार्च रोजी भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तारकर्ली- काळेथर ग्रामपंचायत इमारत जीर्ण बनल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून सुमारे १५ लाख रुपये खर्चून या इमारतीची दुरुस्ती व डागडुजी करून नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये कार्यालय, दोन सभागृह, तलाठी कार्यालय अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तारकर्ली हे पर्यटन गाव असल्याने ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या भिंतींवर दशावतार व इतर स्थानिक लोककला, रापण मासेमारी, सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायविंग अशी भित्तिचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या चित्रांच्या माध्यमातून स्थानिक कला व ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न करून त्याद्वारे शाश्वत पर्यटनाचा संदेश देण्यात आला आहे. या इमारतीत यापुढेही आणखी सुधारणा करून उत्तम ग्रामसचिवालय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सरपंच सौ. केरकर यांनी सांगितले. या इमारतीचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत, तरी या कार्यक्रमास तारकर्ली काळेथर मधील ग्रामस्थ, पर्यटन प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ. केरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page