विनयभंग प्रकरणातील फरार आरोपीच्या दहा महिन्यांनी मुसक्या आवळल्या…

कणकवली पोलिसांची कारवाई आरोपीची पोलिस कोठडी रवानगी

*💫कणकवली दि.०६-:* विनयभंगातील आरोपीच्या तब्बल १० महिन्यांनी कणकवली पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ममता जाधव यांनी ही कारवाई फत्ते केली. दरम्यान आरोपी समीर याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. फोंडाघाट येथील फिर्यादी महिलेचा दत्तक भाऊ असलेल्या आरोपी समीर नामदेव फोंडेकर याने आपल्या घटस्फोटित बहिणीचा विनयभंग केला होता. २३ फेब्रुवारी २०२० रोजी ही घटना घडली होती. भावा बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम समीर विरोधात पीडित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी समीर फोंडेकर याच्यावर गुन्हा दाखल होता. दरम्यान आरोपी समीर याने स्वतःचा मोबाईल बंद ठेवत फोंडयातून पळ काढला होता. आरोपी आपल्या पत्नीसह रत्नागिरी येथे राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार ममता जाधव यांनी समीरच्या पत्नीचा मोबाईल नं मिळवला होता. समीरच्या पत्नीच्या मोबाईलवर महिला हवालदार ममता जाधव यांनी संपर्क साधत आपण रत्नागिरी पोस्टातून बोलत असून पार्सल देण्यासाठी फोंडेकर राहत असलेला पत्ता मोठया खुबीने मिळवला. आरोपी समीरचा पक्का ठावठिकाणा समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ममता जाधव यांनी सहकारी पोलीस कॉन्स्टेबल राहुल तळसकर, कॉन्स्टेबल राऊत यांच्यासह ५ जानेवारी रोजी रात्री रत्नागिरी गाठली. रत्नागिरी शहर व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने रत्नागिरी एमआयडीसी परिसरात रात्रीच जात समीर फोंडेकर राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतून त्याची गचांडी आवळली. आरोपी समीर ला रातोरात कणकवली पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर सोपस्कार पार पाडत त्याला अटक केली. आरोपी समीर फोंडेकर याला कणकवली न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.गजानन तोडकरी यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादानंतर न्यायाधीश सलीम जमादार यांनी आरोपी समीर याला ८ जानेवारी पर्यंत २ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page