Headlines

अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपात अनियमितता

नुकसानग्रस्त श्रेया तुळसकर यांची जिल्हाधिकारी व कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार

बांदा ता.१८-:* जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बांदा व शेर्ले भागातील शेतकरी, व्यापारी, दुकानदार तसेच ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु बहुतांशी लाभार्थ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. काही अपात्र लाभार्थ्यांना आर्थिक लागेबंधातून बेकायदेशीररीत्या अनुदान वाटप करण्यात आले.

परंतु प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अद्याप एक रुपयाही भरपाई दिलेली नाही. नुकसान भरपाई वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून महसूल प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी शेर्लेतील नुकसानग्रस्त श्रेया तुळसकर यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. गतवर्षी जुलै २०२१ मध्ये बांदा परिसरात अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. याचा फटका सर्वसामान्यांसह व्यापारी, दुकानदार, शेतकरी आदींना बसला. प्रशासनाने पंचनामे केलेत मात्र भरपाई काही मिळाली नाही. भरपाईसाठी काही लाभार्थ्यांना उपोषणाचा मार्गही पत्करावा लागला. परंतु आश्वासना शिवाय कोणतीही कार्यवाही झाली नाही.

याप्रकरणात अनेक अधिकारी गुंतले असून प्रशासनाने नुकसान भरपाई देत न्याय द्यावा अशी मागणी श्रेया तुळसकर यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी. तसेच अहवालानुसार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पात्र नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रेया तुळसकर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page