वनराई बंधार्याबाबत कुडाळ बीडीओ यांची होणार चौकशी

स्थायी समितीत गाजला विषय;सभापती नूतन आईर यांच्या उपोषणाचे पडसाद

ओरोस ता.१८-:* कुडाळ सभापती नूतन आईर यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर वनराई बंधारे न बांधता दाखविल्याचा केलेला आरोपावरून स्थायी समिती सभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद झाला. चांगल्या अधिकाऱ्याची सभापती बदनामी करीत आहेत. त्यांच्यामुळे कुडाळ पंचायत समितीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्यावा, अशी मागणी संजय पडते यांनी केली. यावर संतोष साटविलकर यांनी अभिनंदनाचा ठराव घेता येणार नाही. सभापती यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करा, अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी वनराई बंधारे यादीबाबत चौकशी करून पुढील सभेत अहवाल ठेवला जाईल, असे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील सुरुच्या बनात आज संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, शर्वाणी गांवकर, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह सदस्य संतोष साटविलकर, रेश्मा सावंत, रवींद्र जठार, संजय पडते, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी मालवण पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतरत्न लतादीदी, बप्पी लहरी, सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुडाळ सभापती नूतन आईर यांनी बीडीओ विजय चव्हाण यांच्या विराधात केलेले उपोषण सभेत चांगलेच गाजले. संजय पडते यांनी हा विषय काढत सभापती एकट्या आरोप करीत आहेत. उर्वरित एकही सदस्य आरोप करीत नाहीत. त्यामुळे कुडाळ तालुक्याची बदनामी होत आहे. बीडीओ चव्हाण यांनी चांगले काम केल्याने कुडाळ पंचायत समितीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचा अभिनंदन ठराव घ्यावा, अशी मागणी केली. याला संतोष साटविलकर यांनी जोरदार आक्षेप घेत आमच्या पंचायत समितीलाही पुरस्कार मिळाले आहेत. सभापती सौ आईर या जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पहिली त्याची चौकशी करा, अशी मागणी दिली. अध्यक्षा सौ सावंत यांनीही त्याला दुजोरा देत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीईओ नायर यांनी वनराई बंधारे बाबत चौकशी करून पुढील सभेत माहिती दिली जाईल, असे सांगितले.

You cannot copy content of this page