किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीसाठी निधी मंजूर

मालवण ता.१९-:* मालवण तालुक्यातील किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात संकल्पित पाणीसाठा करण्यासाठी बंधारा दुरुस्ती करुन लोखंडी गेट ऐवजी एफ.आर.पी. गेट बसविण्यासाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात संकल्पीत पाणीसाठा ५२६.३० सघमी व मुळ सिंचन क्षमता १७९ हे. आहे.

या बंधाऱ्याला बसविण्यात आलेल्या लोखंडी निडल्स या बहुतांश गंजणे, चोरीस जाणे, बेंड होणे, वाहुन जाणे यामुळे पुर्णतः नादुरुस्त झालेल्या आहेत. तसेच साईड चॅनल गंजून खराब झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यामध्ये संकल्पित पाणीसाठा होत नाही. तसेच बंधाऱ्याचा स्लॅब खालील बाजुने झीज झालेला आहे. या बंधाऱ्याच्या साईड चॅनल व गेटची दुरुस्ती करणे, स्लॅबचे मजबुतीकरण करणे लोखंडी गेट ऐवजी एफ.आर.पी गेट बसवून संकल्पित पाणीसाठा करण्याची मागणी होत होती. या कामाला निधी मंजूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बंधारा दुरुस्ती करुन लोखंडी गेट ऐवजी एफ.आर.पी. गेट बसविण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page