आ राणे, प्रकाश मोर्ये जिल्हा बँक संचालक

बँकेची ओळख शेतकऱ्यांची बँक म्हणूनच राहील:-आ राणेंचा विश्वास

सिंधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाते. यापुढे शेतकर्‍यांबरोबरच जिल्ह्यातील तरुण, तरुणी नवउद्योजकांसाठी ही बँक काम करेल अशी घोषणा या बँकेच्या तज्ज्ञ स्वीकृत संचालकपदी निवड झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तर जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. या बॅंकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा व नारायण राणे यांच्याशी चर्चा करुन तोही प्रयत्न करु असेही आम. नितेश राणे यांनी स्पष्ठ केले.

जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत तज्ज्ञ संचालक म्हणून आमदार नितेश राणे व प्रकाश मोरये यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आमदार नीतेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रकाश मोर्ये विठ्ठल देसाई सौ प्रज्ञा ढवण आदी संचालक उपस्थित होते. यावेळी बोलतांना नितेश राणे म्हणाले जिल्हा बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी आपली निवड झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी व जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी या जिल्हा बँकेच्या माध्यमातून तसेच राणे साहेबांच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विकास घटकांना जिल्हा बँक मदतीचा हात देईल. शेतकरी, मच्छीमार, महिला ,आंबा काजू बागायतदार या घटकांबरोबरच जिल्ह्यातील तरुण तरुणींना उद्योग आणि व्यवसायासाठी प्रेरणा देऊन त्यांनाही उद्योग क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत केली जाईल. सर्व संचालकांच्या मदतीने निर्णय घेतले जातील. त् केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सूक्ष्म लघू उद्योग मंत्रालयाची मदत घेऊन ही जिल्हा बँक जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योग करणार्‍या तरुण तरुणींना भागभांडवलासाठी मदत देण्याची योजना तयार करेल .असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतेतील भरतीतही जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना तरुण तरुणींना प्राधान्याने संधी दिली जाईल. मागील काळात ज्याप्रमाणे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरती केले गेली तसा प्रकार आता यापुढे होणार नाही असे सांगतानाच आमदार नितेश राणे पुढे म्हणाले जिल्हा बँकेत जी कंत्राटी पदे आहेत ती कायमस्वरुपी होण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमित शहा यांचीही भेट घेऊन नामदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅँकेतील कंत्राटी पदे कायम होण्यासाठीही प्रयत्न केला जाईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येण्यासाठी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची मोठी मेहनत आहे.

राणे साहेबांच्या आशीर्वादाखाली व मार्गदर्शनाखाली तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार नीलेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व संदेश ऊर्फ गोट्या सावंत आदी अनेक भाजप नेत्यांच्या मेहनतीने जिल्हा बँकेत भाजपला सत्ता मिळवून दिली आहे. त्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा व भाजप नेत्यांचा ही जिल्हा बँक नेहमीच सन्मान ठेवेल . सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्हा विकासामध्ये अग्रभागी राहून काम करेल व जिल्हावासीय जनतेच्या विकासासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नासाठी ही बँक सदैव अग्रेसर राहील असेही आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहाचे संचालक मंडळाच्या बैठकीत नामकरण करण्यात आले. या सभागृहाला यापुढे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असे नामकरण करण्यात आल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी याच पत्रकार परिषदेवेळी जाहीर केले.

You cannot copy content of this page