सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये भारताची गानसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना सप्तस्वराप्रमाणे त्यांना प्रिय असलेल्या सात चाफ्याच्या झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक अनिल ठाकर यांनी लतादीदींच्या जीवनावर प्रकाश टाकला. संगीतक्षेत्रात कार्यरत असलेले तसेच विविध पदावर काम केलेले प्रशालेचे सर्व माजी विद्यार्थी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी), प्रफुल्ल संगोडकर डॉ. मधुकर घारपुरे, तबलावादक किशोर सावंत, गायिकासमृद्धी सावंत, सीए तन्वी प्रभू, तनया वाडकर, संस्था संचालिका राजश्री टिपणीस यांच्या हस्ते लता दीदींच्या आवडत्या चाफ्याच्या झाडांचे वृक्षारोपण शालेय परिसरात करून अनोख्या पद्धतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्था सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, संचालक रवींद्र स्वार, खजिनदार मुकुंद वझे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सेवाज्येष्ठ शिक्षिका व्ही.जी. चव्हाण, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. लतादीदींनी गायिलेले ‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत समृद्धी सावंत हिने गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. यु. बांदेलकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशालेचे शिक्षक एस. एस. वैज यांनी केले.
