विरण बाजारपेठेत गॅरेजला आग

समीर परब यांचे दोन लाखांचे नुकसान

मालवण ता.१६-:* मालवण तालुक्यातील विरण बाजार पेठ येथील समीर रामचंद्र परब यांच्या मालकीच्या श्री रामेश्वर ऑटो गॅरेजला काल रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागून आतील साहित्य जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

विरण बाजारपेठ येथे समिर रामचंद्र परब यांच्या मालकीचे श्री रामेश्वर ऑटो गॅरेज आहे. काल रात्री साडे आठ वाजता परब हे गॅरेज बंद करुन आपल्या चुनवरे येथे घरी गेले. मात्र काही वेळाने त्यांना विकास नेरुरकर यानी फोन करुन त्यांच्या गॅरेजला आग लागल्याची माहिती दिली. त्यामुळे समीर परब यांनी तात्काळ गॅरेजच्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत गॅरेज शेजारी असलेल्या गिरीश नेरुरकर, प्रमोद पाटील, जयू वाडकर, ओमकार नेरुरकर, आदित्य वाडकर आदी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या आगीत गॅरेज मधील गाड्यांचे विविध स्पेअर पार्ट, दोन ग्रासकटर, मोटरसायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच दुकानाचेही मोठे नुकसान झाले. यामुळे समीर परब यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. तलाठी एस. बी. परब यांनी आज सकाळी या नुकसानीचा पंचनामा केला.

You cannot copy content of this page