कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षणाची अंमलबजावणी घरापासूनच व्हावी

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड

सिंधुदुर्गनगरी.ता.१६-:* कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2006 ची अंमलबजावणी या संवेदनशील विषयावर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने कार्यशाळा घेऊन हिंसाचार मुक्त वातावारण निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. महिला हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी याची सुरुवात प्रत्येकाच्या घरापासून व्हावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले.

जिल्हा माहिला व बालविकास कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व संरक्षण अधिकारी आणि सेवा पुरवणारे यांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली. यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात या कार्यशाळेचा उद्देश आणि अधिनियमामागील पार्श्वभूमी सांगितली.

जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग संतोष भोसले यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून सर्वप्रथम तडजोड होण्यासाठी मार्गदर्शन करावे असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनीही यावेळी पोलीस यंत्रणेची भूमिका स्पष्ट केली. यानंतर कौटुंबिक हिंसाचार अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय याविषयावर वकील निकीता म्हापणकर, कौटुंबिक घटना आणि अहवाल याविषयावर वकील निलंगी रांगणेकर, संरक्षण अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने याविषयावर कनिष्ठ संरक्षण अधिकारी निलम कांबळे, सखी वन स्टॉप सेंटर याबाबत वकील मिनाक्षी नाईक, महिला बाल विकास यंत्रणा, पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांची भूमिका आणि अधिनियम याबाबत वकील श्रीनिधी देशपांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 बाबतच्या पोस्टर्सचे अनावरन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंतर्गत समुपदेशक नमिता परब सूत्रसंचालन केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page