*💫कुडाळ दि.०५-:* कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून, तालुक्यातील अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे स्मरणपत्र निवेदन दिले आहे. कुडाळ तालुक्यात गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री यासारखे अनेक अवैध व्यवसाय फोफावू लागले आहेत. या अनैतिक व्यवसायावर काही पोलिसांचे वरदहस्त असल्याने प्रामाणिक पोलिस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांवर त्यांची दहशत निर्माण करून त्यांचा आवाज दाबला जात आहे. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी याआधी देखील मनसेच्या वतीने पत्रान्वये कुडाळ पोलिस निरीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून अशा व्यवसायांवर व व्यावसायिकांवर अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.याउलट मागील काही कालावधीपासून अशा बेकायदा व्यवसायांत वाढ झाल्याचे तालुक्यातील स्थानिक जनतेकडून नेहमी सांगण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे.काही दिवसांपूर्वी मनसेच्या माध्यमातून तालुक्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडून देत या विक्रीमागच्या खऱ्या सूत्रधारांचा शोध घेवून मुळासकट बिमोड करावा अशा अपेक्षेने आपल्या ताब्यात देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आपले कर्मचारी शोधमोहिम करत आहेत ह्यात दुमत नाही मात्र या व्यवसायामागचे खरे सूत्रधार अद्याप पर्यंत मोकाट असून उजेडात आलेले नाही.शिवाय सोबत मटका जुगार अशा प्रकारांवर देखील त्याच कडवटपणे कारवाई होणे अपेक्षित आहे.कुडाळ तालुक्यात सर्व भागांमधून मटका गोळा करणारे एजंट सर्हासपणे वावरताना दिसत असून उघडपणे संकलन केंद्र उघडून आहेत. हे सर्व प्रकार काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून उघडपणे चालले आहेत असे चित्र आहे.याकडे गंभीरपणे लक्ष वेधून कुडाळ पोलीस ठाण्याने कठोर कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी यामध्ये मनसेचे महाराष्ट्र सैनिक आपल्याला Whatsapp संदेश वहनाच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अवैध व्यवसायाची ठिकाण,व्यवसाय करणारे व्यक्ती आदींबाबत सर्व माहिती पुरवणार असून पोलीस प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून अवैध व्यवसायांचा मुळासकट बिमोड करण्यासाठी प्रामाणिक सहकार्य व प्रबळ इच्छाशक्तीची अपेक्षा आहे.त्यामुळे आजची तरुण पिढी व्यसनाधीन होवून निष्क्रिय होईल हे भविष्यातील संकट ओळखून गांभीर्यपूर्वक अवैध व्यवसायांविरोधी धडक कारवाई मोहीम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा सचिव बाळा पावसकर,उपतालुकध्यक्ष दिपक गावडे व अविनाश अणावकर,मनसे विद्यार्थी सेना उप जिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, मनवीसे तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,विभाग अध्यक्ष रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अनैतिक व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी मनसे शिष्टमंडळानी कुडाळ पोलिस निरीक्षकांची घेतली भेट
