आशियेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शाश्वत शैक्षणिक विकास व्हावा:सुरेश कदम

व्हीओ मोबाईल कंपनीतर्फे प्राथमिक शाळा आशिये येथे शैक्षणिक साहित्य वाटप

कणकवली ता.१२-:* विद्यार्थ्यांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवून विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शाश्वत सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने व्हीओ मोबाईल कंपनीच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक , क्रीडा साहित्य देण्यात येत आहे. व्यवसायातून आर्थिक नफा मिळवत असतानाच ज्या समाजामुळे फायदा झाला त्या समाजाप्रती आपले ऊत्तरदायित्व पार पाडले पाहिजे या हेतूने आज आशिये गावातील प्राथमिक शाळेला शैक्षणिक, क्रीडा साहित्य मोफत प्रदान करत असल्याचे प्रतिपादन व्हीओ मोबाईल कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर सुरेश कदम यांनी केले.

पुणे येथील हिसोवा प्रा. ली.व्हीओ मोबाईल यांच्या सीएसआर फंडातून , उर्मी फाउंडेशन पुणे, ऋषी सेल्स यांच्या सहकार्याने पूर्ण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा आशिये येथे शैक्षणिक, ईलर्निंग साहित्य स्क्रिन प्रोजेक्टर, सिलिंग फॅन, ग्रीन बोर्ड, क्रीडा साहित्य तसेच साउंड सिस्टीम देणगी स्वरूपात देण्यात आले. यावेळी कदम बोलत होते. यावेळी व्हीओ मोबाईल कंपनीचे एचआर मॅनेजर जयदीप मोहिते, फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण, एचआर असिस्टंट मॅनेजर तेजस डेव्हिड, ब्रँच मॅनेजर रविराज पाटील, मुकेश हातीसकर, सिद्धेश सावंत, ऋषी सेल्स चे समीर ठक्कर, देवदास बाणे, उर्मी फाउंडेशन चे जैनबी मीर, आशिये सरपंच शारदा गुरव, उपसरपंच संदीप जाधव, पं स माजी उपसभापती महेश गुरव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निधी पुजारे , उपाध्यक्ष संजय बाणे, केंद्रप्रमुख शुभांगी दळवी, विलास खानोलकर, सुनील बाणे,महेश तानु गुरव,ग्रा.प.सदस्य,प्रवीण ठाकुर, समीधा ठाकुर, महेश बाणे,सुरज बाणे,गुरुप्रसाद बाणे, मिलींद कदम,शिक्षिका सौ.मोरे ,सौ.सावंत , शिक्षक श्री.जातेकर , विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना व्हीओ मोबाईल चे एचआर मॅनेजर जयदीप मोहिते म्हणाले की,केवळ शैक्षणिक क्रीडा साहित्य देऊन आमचे सामाजिक दायित्व संपणार नाही.तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेसोबत त्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी व्हीओ मोबाईल कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या स्कॉलरशिप च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या टॅलेंट ला वाव मिळेल.त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित होण्यास मदत होईल.उर्मी फाउंडेशन च्या जैनबी मीर यांनी व्हीओ कंपनी च्या माध्यमातून उर्मी संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात करत असलेल्या कामाचा आढावा घेतला. आशिये शाळेला दिलेल्या सर्व शैक्षणिक, क्रीडा साहित्याचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांनी करावा. शिक्षकांनी या साहित्याद्वारे अधिक प्रभावीपणे अध्यापन करावे असे आवाहन केले.

पं. स.चे माजी उपसभापती महेश गुरव यांनी शैक्षणिक, क्रीडा साहित्याची भरीव देणगी दिल्याबद्दल व्हीओ कंपनी चे आभार मानले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना मालवणी कवी तथा आशिये जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी विलास खानोलकर यांनी अध्यात्मिक शांततेसाठी जशी मंदिरे आवश्यक आहेत तशीच जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानमंदिरे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाने जसे देवळात गेल्यानंतर देवाला धार्मिक साहित्य हेत दिले जाते त्याचप्रमाणे आपल्या मुलाच्या शाळेच्या विकासासाठी आपापल्या कुवतीनुसार आर्थिक मदत प्रतिवर्षी सढळहस्ते करावी असे आवाहन केले. यावेळी केंद्रप्रमुख शुभांगी दळवी, प्रभारी मुख्याध्यापिका अनघा लाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लाड यांनी केले. प्रास्ताविक अनघा लाड यांनी केले तर आभार सुनिल बाणे यांनी मानले.

You cannot copy content of this page