आ नाईक, माजी नगराध्यक्ष कांदळगांवकर यांच्यावर सुदेश आचरेकर यांची टीका;भाजपची सत्ता आल्यास काम पूर्ण करण्याचा केला दावा
मालवण ता.०९-:* तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून आणि तत्कालीन मालवण नगरपालिका बॉडी च्या माध्यमातून मालवण शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा भुयारी गटार योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असताना मात्र उर्वरित २० टक्के काम पूर्णत्वास नेण्यास गेल्या पाच वर्षात शिवसेनेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांना अपयश आले आहे. ठेकेदार बदलल्यास योजनेचा खर्च आणखी वाढणार आहे याची कोणतीही माहिती न घेता आमदार वैभव नाईक हे ठेकेदारावर खापर फोडून त्याच्याकडून योजनेचे काम काढून घेण्याची नौटंकी करत आहेत, अशी टीका करत शिवसेनेला पूर्णत्वास नेण्यास न जमलेली भुयारी गटार योजना नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यावर आम्ही पूर्णत्वास नेऊ असा दावा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर हे बोलत होते. यावेळी भाजप नेते दत्ता सामंत, दिपक पाटकर, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, आबा हडकर, विजय केनवडेकर, ललीत चव्हाण, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, राजू बिड्ये, महेश सारंग, सदा चुरी तसेच इतर उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, भुयारी गटार योजनेच्या कामासाठी सन २०१६ पासून २०२१ पर्यंत सुमारे सहा कोटी रूपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. असे असताना आमदार वैभव नाईक हे ठेकेदाराला पैसे दिलेच नाही असे सांगत असतील तर त्यांनी प्रथम प्रशासनाकडून माहिती घेऊनच बोलावे. पाच वर्षात भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी आमदारांनी एकदाही सर्व नगरसेवक आणि ठेकेदार यांची बैठक घेवून चर्चा केलेली नाही. तसेच प्रशासनाकडेही याबाबत पाठपुरावा केलेला नाही. निधी हा शासनाकडून उपलब्ध होत असतो, मात्र योजना पूर्ण करण्याची ताकद लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरील यंत्रणांमध्ये आवश्यक असते, मात्र आमदारांनी काहीच केलेले नसल्याने ही योजना शिवसेना नगराध्यक्षांच्या पूर्ण कार्यकालात पूर्ण होऊ शकलेली नाही. यामुळे आमदारांनी आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करू नये, असेही आचरेकर म्हणाले.
आपले अपयश झाकण्यासाठी आमदार वैभव नाईक हे आता ठेकेदाराकडून काम काढून घेण्याची भाषा करत आहेत. मात्र भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराकडील काम काढून घेण्यासंदर्भात यापूर्वी नगरपालिकेत घेण्यात आलेला ठराव जिल्हाधिकारी यांनी फेटाळला होता. आणि आता तर ८० टक्के योजनेचे काम पूर्ण झाले असल्याचे प्रशासन सांगत असल्याने अशा वेळी ठेकेदार बदलण्यास शासन परवानगी देणार का ? तसेच ठेकेदार बदलल्यास योजनेच्या कामासाठी आणखी १० ते १२ कोटी रुपये जास्त खर्च येणार आहे. हा वाढीव निधीचा अतिरिक्त भार शासन किंवा नगरपालिका उचलणार का ? त्याचा भुर्दंड मालवणच्या नागरिकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे आमदारांनी शासनाकडून माहिती घेऊन बोलावे. जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करू नये. सद्यस्थितीत ठेकेदाराकडून निश्चीत वेळ मर्यादा निश्चीत करून त्याच्या कडूनच उर्वरीत काम पूर्ण करून घेणे क्रमप्राप्त आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले. पाच वर्षात सत्ताधारी शिवसेनेला भुयारी गटार योजना पूर्ण करणे जमले नाही. येणाऱ्या मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. नारायण राणेंनी आणलेली ही योजना सत्तेवर आल्यावर भाजपच पूर्णत्वास नेणार आहे, आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा दावा यावेळी सुदेश आचरेकर यांनी केला. नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून मालवण शहरात देशातील पहिले रॉकगार्डन उभारण्यात आले. त्याठिकाणी चांगल्याप्रकारे नियोजन करून प्रशिक्षित व्यक्तींच्या ताब्यात गार्डनची देखरेख देण्यात आली होती. मात्र सध्या गार्डनची दुर्दक्षा झालेली आहे. रॉक गार्डनच्या ठेक्यात कोण माजी लोकप्रतिनिधी आहे? याचीही माहिती आमदारांनी घ्यावी. जेणेकरून शहरातील रॉकगार्डनच्या आजच्या परिस्थितीची माहिती होवू शकते. एखाद्या प्रकल्पाची कशापद्धतीने दुर्दशा करता येवू शकते हे गेल्या पाच वर्षात जनतेने पाहिले आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले.
