प्रसाद गावडे यांचा आमदार वैभव नाईक यांना सल्ला
कुडाळ – कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक एकीकडे गगनबावडा घाटरस्त्याची पाहणी करून फोटोबाजी करतात. मात्र, दुसरीकडे आपल्याच मतदार संघातील सोनवडे घाटमार्गाच्या सद्यस्थितीबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत, हे दुर्दैव आहे. घाटमार्गाच्या कामात मागील पाच वर्षात एक साधी वीट का रचली गेली नाही? ह्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी जनतेला द्यावे, असा टोला मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी लगावला आहे.
गावडे यांनी म्हटले आहे की, मागील पाच वर्षांपासून खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक दरवर्षी निवडणुकांच्या तोंडावर भूमीपुजन कार्यक्रमांची नौटंकी करून जनतेची फसवणूक करत आहेत. प्रत्यक्षात मागील पाच वर्षात सोनवडे घाट रस्त्यासाठी दमडीचा निधीदेखील आणू शकले नसल्याने घाटमार्गाचे काम अधांतरी राहिले, ही खरी शोकांतिका आहे. या सोनवडे घाटमार्गासाठी एवढी निवेदने व आंदोलने करुनही राज्य सरकारला जागं येणार नसेल तर सत्ताधारी शिवसनेनेच्या लोकप्रतिनिधींनी तसे जनतेसमोर जाहीर करावे. अन्यथा प्रत्यक्षात कामकाजास कधी सुरुवात होणार याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी खरमरीत टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
