मालवण ता.०८-:* भारताच्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्तब्धता पाळून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहतानाच त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचा आढावा घेण्यात आला.
प्रारंभी प्रशालेमध्ये शास्त्रीय संगीताचा धडा गिरवत असलेले प्रशालेचे विद्यार्थी अवधूत पारकर, नितीन परब, साहील चव्हाण, तुकाराम लाड, वैष्णवी आंगणे, अस्मी पारकर, सुजल आंगणे, प्रणाली परब यांच्या समवेत शास्त्रीय संगीत क्षेत्रात करिअर करत असलेली प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु. आर्या प्रवीण पारकर हिच्याहस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून त्यांना सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी ओझर विद्यामंदिरचे शिक्षक व संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले प्रवीण पारकर यांनी आपल्या मनोगतातून लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेत लतादीदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात करिअर करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास ओझर विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
