बेकायदेशीर वाळू वाहतूकीवर कुंभारमाठ येथे महसूल विभागाची कारवाई…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात होणारी वाढत्या चोरट्या वाळूची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने पथके निर्माण केली असून काल रविवारी रात्रौ पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ जरीमरी घाटी येथील रस्त्यावर मालवण महसूल विभागाच्या पथकाने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला. उद्या मंगळवारी संबंधित डंपर मालकावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे .

काल रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ येथील जरीमरी घाटीतून वाळूची वाहतूक करणारा एमएच ०६ बी.डी. ०९९४ या क्रमांकाचा डंपर महसूल विभागाच्या पथकाने अडवला. या डंपर मध्ये दोन ब्रास वाळू सापडून आली. मात्र चालकाकडे वाळू वाहतुकीचा पास न सापडल्याने विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी हा डंपर महसूलच्या पथकाने ताब्यात घेत मालवण तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवला आहे.मालवण तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार आनंद मालवणकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, तलाठी श्री. राठोड, वायंगणी तलाठी श्री. कंठाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी दिली.

You cannot copy content of this page