खास. विनायक राऊत यांनी व्यक्त केला शोक
कुडाळ ता.०७-:* कोकणभूषण, लोकराजा सुधीर कलिंगण आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे असे जाणे मनाला चटका लावून जाणारे असून त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील दशावताराची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे.
खासदार राऊत यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर गावचे थोर कलारत्न, दशावतार कलेतील भिष्माचार्य, दशावतार चालक-मालक संघाचे सहसचिव, महाराष्ट्र शासन लोककला मानधन शिफारस समिती सदस्य, सुधीर कलिंगण आज काळाच्या पडद्याआड गेले. कोकणची दशावतार लोककला सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. यामध्ये लोकराजा सुधीर कलिंगण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. दशावतार कला टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण यांनी नवोदित कलाकारांना सातत्याने मार्गदर्शन केले. दशावतारी कलेतील हा अनभिषिक्त सम्राट आज आपणांस सोडून गेला. ईश्वर त्यांना सदगती देवो, अशा शब्दात राऊत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
