भारताची ‘संगीतलता’ हरपली;एक दीर्घ स्वरसाधना थांबली
सावंतवाडी ता.०६संतोष ठाकूर-:* अखेर ‘ती’ दुःखद वार्ता आली आणि अखिल संगीत विश्व हादरले. सप्त सूर स्तब्ध झाले. ज्यांची गाणी ऐकत तीन पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या स्वरांशिवाय आणि नावाशिवाय ‘संगीत’ हा शब्द अर्थहीन होतो, ज्यांना आदर्श मानून अनेक गायक-संगीतकार घडले, त्या सर्वांच्या लाडक्या ‘लतादीदी’, भारताची ‘गानकोकिळा’ अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला.
गेली आठ दशके अखंड सुरु असलेली एक दीर्घ स्वरसाधना आज अखेर थांबली. लतादीदींनी अनेक दशके भारतीय संगीतक्षेत्रावर आणि रसिकमनावर अधिराज्य गाजविले. त्यांचे स्वर हिंदुस्थानी संगीताच्या प्रत्येक प्रकारात व्यापून राहिले आहेत. मग ते बालगीत असो, चित्रपटगीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो वा गझल! भारतातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायिली आहेत. प्रत्येक ख्यातनाम गायक, संगीतकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक आणि आतुर होता. तेव्हाच्या वैजयंतीमालापासून ते आजच्या प्रीती झिंटापर्यंतच्या शेकडो नायिकांना त्यांनी स्वर दिला. संगीतकार रोशनपासून ए. आर. रहमान, सलील कुलकर्णी यासारख्या युवा संगीतकारांबरोबर काम केले. हल्लीच सलील कुलकर्णी यांच्यासाठी गायिलेले त्यांचे ‘आता विसाव्याचे क्षण’ हे मराठी गाणे तर अगदी युवावर्गालाही भावले होते. अनेकांच्या ‘कॉलरट्यून’वर ऐकू येत होते.
हिंदी चित्रपटातील मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, मन्नाडे, मोहम्मद अजीज, शब्बीर कुमार, एस. पी. बालसुब्रमण्यम, नितीन मुकेश, कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम या दिग्गज गायकांबरोबर तसेच शंकर-जयकिशन, रोशन, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित, ए. आर. रेहमान आदी मातब्बर संगीतकारांसाठी लतादीदींनी गायिलेली हजारो गाणी अजरामर झाली आहेत. मराठी चित्रपटातील पी. सावळाराम, वसंत प्रभू, एन. दत्ता, वसंत देसाई, सुधीर फडके, यशवंत देव यासारख्या संगीतकारांसाठी गायिलेली शेकडो गाणी आजही महाराष्ट्रातील घराघरात ऐकली जातात. ‘रागाधिराज’ पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गज शास्त्रीय गायकासोबत त्यांनी गायिलेल्या हिंदी भक्तीरचनाही सुप्रसिद्ध झाल्या आहेत. ख्यातनाम गझल गायक जगजीत सिंग यांच्यासह गायिलेल्या गझलही रसिकांना भावल्या आहेत.
टीव्ही आणि रेडिओचा असा एकही दिवस नाही ज्या दिवशी लतादीदींचे एकही गाणे लागले नाही. गायिका म्हणून काम करतानाच लतादीदींनी ‘आनंदघन’ या नावाने काही चित्रपटांना संगीत देऊन अवीट गाणी संगितरसिकांना दिली आहेत. त्यात ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील ऐरणीच्या देवा तुला, नको देवराया ही गाणी आजही आपल्या ओठावर नकळत येतात. त्याप्रमाणेच त्यांनी गायिलेली शेकडो हिंदी, मराठी गाणी आज सुख आणि दुःखातही आपल्यासोबत आणि आपल्या ओठांवर कायम राहिली आहेत. अशा या महान संगीतलतेचे स्वरमहात्म्य एका लेखात सामावणे कदापि शक्य नाही. आज जरी लतादीदी आपल्यात नसल्या तरी आपल्या गोड स्वरांनी आणि अनेक अवीट गाण्यांनी त्या सदैव आपल्यासोबत राहणार आहेत. त्यांच्याच स्वरात म्हणायचे तर… रहे ना रहे हम मेहका करेंगे बनके कली बनके सबा बागेवफामे… लतादीदी, तुम्ही स्वररुपाने जना-मनात आणि संगीत विश्वात सदैव व्यापून राहिलात आणि राहालही…!
