पीएमश्री बांदा केंद्रशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात…

⚡बांदा ता.१६-: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळेचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
श्री कामत म्हणाले, “बांदा केंद्रशाळा ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारी माझ्या मतदारसंघातील आदर्श शाळा आहे. शाळेच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. शाळेची नवीन इमारत उभारण्याचे स्वप्न येत्या काळात पूर्ण करून जिल्ह्यातील आदर्श शाळा विकसित करण्याचा मानस आहे.”
यावेळी त्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सुमारे २० विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना खाऊ वाटप करून प्रवेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून व सजविलेल्या वाहनातून बांदा बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमोद कामत यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व गणवेश देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळेसाठी आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. बाळकृष्ण कामत यांनी वॉटर फिल्टर व लोखंडी रेलिंगसाठी १ लाख १२ हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचे प्रतिनिधी संतोष विर्णोडकर यांनी गौरवपत्र स्वीकारले. इयत्ता सातवी (२००१) च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागील प्रवेशद्वारासाठी ५५ हजार ७०० रुपयांची देणगी दिली असून त्यांच्यावतीने हनुमंत येडवे यांनी गौरवपत्र स्वीकारले. तसेच डॉ. संजय बर्वे यांनी अखंड बक्षीस योजनेसाठी २५ हजार रुपये, तर समीर कल्याणकर यांनी पाण्याच्या टाकीसाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमात अन्वर खान यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक असनकर यांनी केले. सूत्रसंचालन गजानन सावळ यांनी, तर आभार रंगनाथ परब यांनी मानले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, रुपाली शिरसाट, शोभराज शेर्लेकर, राजाराम सावंत, जावेद खतीब, हेमंत मौर्य, संतोष बांदेकर, अजय महाजन, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, राधिका गवस, रक्षाली राणे, उर्मिला सावंत, समीर कल्याणकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच शिक्षक गजानन सावळ, कृपा कांबळे, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसेनजीत बोचे, जागृती धुरी, अर्चना देसाई, कृणाली मस्के, मनिषा मोरे आणि स्नेहा घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो:-
बांदा केंद्रशाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मान्यवर व शिक्षक.

You cannot copy content of this page