शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन:पिंगुळीतील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा..
⚡कुडाळ ता.१६-: पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांनी विविध कंपन्या आणि विद्यापीठ यांनी शिफारस केलेले भात बियाणे वापरणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरण झाल्यामुळे आजचा शेतकरी प्रगतीच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल असे प्रतिपादन बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. डॉ मर्दाने यांनी पिंगुळी गावातील शेतकऱ्यांना अभ्यास विषयक भाताच्या नवीन सुधारित जाती तसेच यांत्रिकीकरण याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
जिथे भात तिथे समृद्धी या उक्तीनुसार आपण आपली शेती करणे काळाची गरज आहे कोकणात घाटमाथ्यापेक्षा तिप्पट ते चौपट पाऊस पडतो त्या पावसाचं नियोजन कसे करावे , नवनवीन जातीच्या भातबियाणे आहेत त्याचा आपण आधुनिक शेतींमध्ये वापर कसा करावा याबाबतच्या माहितीसाठी पिंगुळी ग्रामपंचायतच्या वतीने पिंगुळी गावातील शेतकऱ्यांसाठी शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान या अनुषंगाने कृषी विषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील कृषी विज्ञान केंद्राला या सर्व शेतकऱ्यांनी भेट दिली. विशेष म्हणजे या केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी पारंपरिक व आधुनिक भातशेती बाबत आणि बियाणाबाबत बहुमोल मार्गदर्शन केले ते म्हणाले,आजच्या आधुनिक युगात यांत्रिकीकरणामुळे शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे वाटचाल करावी आता शेतीमध्ये मनुष्यबळ फार कमी झाले आहे त्याची जागा यांत्रिकीकरणांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाबाबतही सतर्क राहिले पाहिजे आपल्या शेतात अधिक भात कसे घेता येईल यासाठी विविध कंपन्या व विद्यापीठांनी शिफारस केलेले भात बियाणे वापरणे गरजेचे ठरले आहे कोकणात पालापाचोळा हा शेतामध्ये जाळला जातो तो न जाळता साठवून त्याचे सेंद्रिय खत करता येते आणि त्या खताचा वापर आपण शेतात योग्य प्रकारे करू शकतो आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भरघोस उत्पादन घेऊ शकतो यांत्रिकीकरणाच्या या वाटचालीत शेतकऱ्यांनी नवनवीन शेती विषय प्रकल्प राबवावेत चार सुत्री भात लागवड, संवर्धित भात शेती, श्री पद्धतीने लागवड याबाबत डॉ मर्दाने यांनी विस्तृत माहिती दिली या दौऱ्यात पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश मसके जेष्ठ शेतकरी प्रमोद धुरी जयवंत गावडे पत्रकार अजय सावंत,महेश पालकर अरुण सावंत राजन पांचाळ
बापू पिंगुळकर विठ्ठल राऊळ,नामदेव पिगुळकर दिनकर सावंत चिंतामणी सावंत बाबाजी दळवी सतीश धुरी संदेश गावडे,गणेश शेटकर प्रकाश सडवेलकर निश्चय मसके,राजन मोर्ये नरेंद्र बावलेकर सोहम आकेरकर सचिन गावडे दशरथ सावंत आदी प्रगतशील जेष्ठ शेतकऱ्यांसह युवा वर्गाचा सुद्धा समावेश होता.
बॉक्स
नवीन भातबियाणेचा अवलंब करू प्रमोद धुरी
या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले प्रगतशील जेष्ठ शेतकरी प्रमोद धुरी यांनी सांगितले की कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कर्जत या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्हाला शेतीविषयक भरपूर मार्गदर्शन लाभले कर्जत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमच्याकडे होत असलेली भातशेती लक्षात घेता भाताच्या नवीन जाती या आम्हाला या ठिकाणी अनुभवता आल्या त्याचा वापर आम्ही आमच्या शेतामध्ये कसा करता येईल आणि शेतीत दाम दुप्पट उत्पादन कसे करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच प्रयत्न करणार तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे ए आय शेतकरी ही संकल्पना समजली असे सांगितले
बॉक्स
शेती दौरा आमच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मंगेश मसके
शेती अभ्यास विषयक दौऱ्याबाबत बोलताना उपसरपंच मंगेश मसके म्हणाले पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बारामती व कर्जत या ठिकाणी काढण्यात आलेला शेती विषयक अभ्यास दौरा आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास करता आला तर कर्जत येथील विज्ञान केंद्रात भात शेतीच्या नवीन जाती आणि यांत्रिकीकरणाचा वापर याबाबत विस्तृत माहिती मिळाली असे ग्रामपंचायत उपसरपंच श्री मसके यांनी सांगितले.
