कणकवली ता.०१-:* जिल्हा बँक निवडणूकीतील सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी राकेश परब सोमवारी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली मंगळवारी सकाळी ८ वाजता कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले . यात राकेश परब याला ४ फेब्रुवारीपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राकेश परबच्या अडचणीत वाढ झाली होती . मात्र काल सोमवारी सकाळी राकेश परब कणकवली पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या स्वाधीन झाला . न्यायालयासमोर रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी राकेश याच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती .आयफोन जप्त करणे तसेच आयफोन पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यासाठी वेळ आवश्यक असल्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली .
राकेश परब यांच्या वतीने युक्तिवाद करताना अँड . उमेश सावंत यांनी १४ दिवसांच्या पोलिस कस्टडीच्या मागणीला जोरदार आक्षेप घेतला . हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून संशयित आरोपी राकेश परब हा स्वतःहून काल सोमवारी सकाळी कणकवली पोलिसात हजर झाला . असे असताना पोलिसांनी न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणून न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद केला . संशयित आरोपी स्वत : हून हजर झालेला असताना काल सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता आरोपीला अटक दाखवण्यात आली . या गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यासारखी काही बाब राहिली नाही असा युक्तिवाद अॅड . उमेश सावंत यांनी केला . त्यावर न्यायालयाने पोलिसांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळत राकेश परब याला ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली
