मालवण ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठिंबा आहे, मात्र व्यवसाय बंद ठेवून मेळाव्यात सहभागी होण्याचे व्यापारी संघाने केलेल्या आवाहनाला आमचा विरोध असून मेळावा ऑनलाईन व्हर्च्युअल पद्धतीने असल्याने व्यवसाय चालू ठेवूनही व्हर्च्युअल पध्दतीने होणाऱ्या व्यापारी मेळाव्यात सहभागी होता येते त्यामुळे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय चालू ठेवून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे. व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी हि संघटना चांगले कार्य करत आहे. पर्यटन महासंघ स्थानिक व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या सोबत आहे. परंतु व्यापारी महासंघाच्या व्यवसाय बंद ठेऊन मेळाव्यात सहभागी व्हावे या आवाहनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाचा विरोध आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे उध्वस्त झालेल्या व्यावसायिकाला व्यवसाय बंद ठेवणे हे आवाहन चुकीचे वाटते तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पद्धतीने असल्याने व्यापारी व व्यावसायिक आपला व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेऊन ऑनलाईन व्यापारी मेळाव्यात आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे, असेही अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
