कणकवली ता.२९-:* “सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट” या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या कारकिर्दीत ही योजना सुरू करण्यात आली होती.सिंधुदुर्ग ते पंढरपूर पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत मोफत आरोग्य सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाते.
कोविड काळात गेली दोन वर्ष ही योजना बंद असताना आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना संजना सावंत यांच्या माध्यमातून योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली. कणकवलीत कलमठ कलेश्वर मंदिर जवळ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचर, औषध आदी सुविधा या वारकऱ्यांसोबत पंढरपूर पर्यंत आरोग्य पथकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. कणकवली ते पंढरपूर पायी जाण्याकरिता सुमारे 15 दिवस लागतात , या कालावधीत पायी जाणार्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हावी याकरिता त्यांच्यासोबत हे आरोग्य पथक कार्यरत असते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, गजा देसाई, स्वप्निल चिंदरकर, शिवसुंदर देसाई, परेश आचरेकर यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
