अनिल चव्हाण यांचा आरोप;पंधरा दिवसात खड्डे न बुजविल्यास उपोषणाचा दिला इशारा
आंबोली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील ‘दिलजमाई’मुळे आंबोली घाट ठेकेदारांसाठी आंदण झाला आहे. ठेकेदार गब्बर झाले असून बोगस कामामुळे घाटरस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे. येत्या पंधरा दिवसात आंबोली घाट रस्त्यातील खड्डे बुजवून प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आंबोली येथील अनिल चव्हाण यांनी इशारा दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आंबोली घाट तीन ठेकेदारांना पाच वर्षासाठी ‘लिज’वर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाटून दिला आहे. फक्त निविदा काढून ठेकेदारांना देणे आणि टक्केवारी घेणे एवढेच काम बांधकाम विभागाचे आहे. त्यामुळे चार ठेकेदारांना घाटरस्ता आंदण दिला आहे. हे ठेकेदार कोट्यवधींची निविदा घेण्यासाठी धडपड करतात. रस्ते बोगस करतात आणि मग ते आठ दिवसात उखडतात. मग सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाचे कारण पुढे करते. असे बरीच वर्षे चालले आहे. तीन वर्षे रस्त्याचे हमीपत्र असते. त्यात दुरुस्ती नमूद असते. मात्र, ठेकेदार खड्डे भरताना हात वर करतात आणि परवडत नाही म्हणून कांगावा करतात. मात्र, निविदा घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यामुळे घाटातील रस्त्याची विल्हेवाट लागली आहे.
अधिकाऱ्याचे काम घाट रस्ता सुस्थितीत ठेवणे आहे. मात्र, ठेकेदारासमोर मान वर न करता केवळ कमिशन खाणारे अधिकारी आहेत. त्यामुळे आंबोली घाटरस्त्यात केवळ ठराविक ठिकाणचे खड्डे ठेकेदाराने भरले. जे खड्डे भरले, त्यात कोणतीही रस्त्याची लेवल नाही. त्यावर रोलर फिरविला नाही. उंच खड्डे भरून ठेवले आहेत. मात्र, घाटात रस्ता खड्डेमय आहे. वळणावर खड्डे तसेच आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. शिवाय गाड्यांचा दुरुस्ती खर्च वाढला आहे. धोकादायक वळणावरदेखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र, हे खड्डे भरण्याचे कोणतेही काम बांधकाम विभागाकडून होत नाही. घाटातील मुख्य दरड पडलेल्या ठिकाणी दरीच्या बाजूने कठडा बांधलेला नाही. त्यामुळे धोकायकायक स्थिती आहे. यावर्षीही खड्डे भरण्याचे काम बोगस झाले आहे. कामावर एकदाही शाखा अभियंता दिसलेला नाही.आदर्श पाटील यांची बदली झाल्यानंतर कोणताही बांधकाम विभागाचा अधिकारी फिरकला नाही. कामावर कोणत्याही अधिकाऱ्याने पाहणी केली नाही. रस्त्याचे खड्डे ज्या पद्धतीने भरले त्यावरून त्या अधिकाऱ्याचे इंजिनियर शिक्षण झाले आहे की तो बोगस आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. आंबोलीत स्थानिक मैलकुली भरतीबाबत कोणताही पाठपुरावा आश्वासन दिल्याप्रमाणे केला नाही. केवळ रस्ता वर्ग केला असे गेली पाच वर्षे कारण सांगून अधिकारी आणि ठेकेदार गब्बर झाले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात घाटातील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा आंबोली येथील अनिल चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

