कणकवली 20 जानेवारी (प्रतिनिधी)– व्यापारी संघाच्या विकासात्मक कामाला फोंडाघाट ग्रामपंचायतीचे सदैव सहकार्य मिळेल. यावेळी व्यापाऱ्यांनीही आपला व्यवसाय उद्योग करताना, स्वतःपासून सतर्क राहून, आपल्या दुकानासमोर लावलेल्या दुचाकी-चारचाकीमुळे वाहतूक कोंडी होणार नाही,याची दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच संतोष आग्रे यांनी केले.
फोंडाघाटच्या नवनियुक्त व्यापारी संघाच्या कार्यकारिणीने, परप्रांतीय व्यावसायिकांच्या संदर्भात, ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच संतोष आग्रे,ग्रामविकास अधिकारी चौलकर, सदस्य विश्वनाथ जाधव यांची भेट घेऊन निवेदन- ठराव सुपूर्त केला. यावेळी बोलताना सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेपुढे हे निवेदन- ठराव ठेवून सदस्यांच्या विचारांनी यावरील निर्णय व तोडगा लवकरच कळविला जाईल, आजवर फोंडाघाट बाजार पेठेतील बहुतांशी व्यापारी शासनाचे, ग्रामपंचायतीचे तसेच अन्नभेसळ,वजन- मापे यांचे दाखले न घेता व्यापारउदीम करीत आहेत.याकडे माणुसकी आणि कायदे यांची सांगड घालून दुर्लक्ष केले जाते. मात्र यापुढे व्यापारी संघाने सहकार्य केल्यास, व्यापाऱ्यांच्या दाखल्यांची-लायसन्स-कागदपत्रांची तपासणी ग्रामपंचायतीद्वारे करणे सोयीचे होईल.
आणि कुणावरही अन्याय होणार नाही असे सांगितले.तसेच वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या “पे अँड पार्क”सोयीचा संबंधित वाहनधारकांनी गांभीर्याने लाभ घ्यावा, ज्यामुळे पेठेतील वाहतूक खंडित होणार नाही आणि व्यापार-उदीम सुरळीत आणि विकसित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुकाने बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्यानंतरही ज्यांनी आपली दुकाने व्यवसाय सुरू ठेवली, त्यांना संध्याकाळी बाजारपेठेतील व्यापारी संघाच्या सदस्यांनी विनंतीवजा समज दिली. यापुढील बुधवारी ज्यांची दुकाने दुकाने सुरू असतील त्यांना पुन्हा समज देऊन नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे समजते. यावेळी संघाचे अध्यक्ष यशवंत मसुरकर, उपाध्यक्ष बबन पवार, सचिव संदीप पारकर, खजिनदार गुणेश कोरगावकर, सदस्य सचिन तायशेटे, केसरकर, रमेश भोगटे, प्रथमेश रेवडेकर, केदार रेवडेकर,समीर मांगले, नागेश कोरगांवकर, दिनेश नारकर, आनंद पावस्कर, संतोष पारकर, अविनाश सापळे, विठ्ठल सावंत, इत्यादी व्यापारी उपस्थित होते.
