प्रा. रुपेश पाटील यांचे कुडाळ येथील कार्यक्रमात प्रतिपादन
सावंतवाडी : कोकणरत्न बॅ. नाथ पै म्हणजे भारतीय संसदेला पडलेले एक गोड स्वप्न होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे संसदेचा एक काळ अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा, इतका ओतप्रोत भरलेला दिसून येतो, असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात केले. कुडाळ येथील महात्मा गांधी लोकसेवा संघ संचलित, बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालयात नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. रुपेश पाटील यांचे ‘ बॅ. नाथ पै- कार्य,कर्तृत्व व नेतृत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुंबरकर, सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे, संस्थेचे सदस्य प्रसाद धडाम, विठ्ठल पाटणकर, शाळेचे मुख्याध्यापक महादेव सातपुते आदी उपस्थित होते. प्रा. पाटील पुढे म्हणाले, वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेले बॅ. पै यांच्या संसदेतील भाषणांचा प्रत्येकाने अभ्यास करावा, इतका प्रचंड व्यासंग नाथ पै यांचा होता.
केवळ ४९ वर्षाचे अल्प आयुष्य लाभलेले नाथ पै म्हणजे भारतीय संसदेतील एक ज्ञानाचा महामेरू होते. सडेतोडपणा, अभ्यासू वृत्तीने इतरांसमोर आपल्या प्रश्नांची सरबत्ती करण्याची असलेली त्यांची धमक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडण्याची त्यांची हातोटी हे सर्वच गुण त्यांना लीलया अवगत होते. त्यामुळे आजही नाथ पै यांच्या चरित्राचे अध्ययन करणे काळाची गरज आहे. बॅ. नाथ पै म्हणजे केवळ कोकणरत्न नसून ते देशाचे एक थोर रत्नच आहेत. गेल्या अनेक वर्षात असा संसदपटू झाला नाही आणि होणे कदापि शक्य नाही, असेही प्रा. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले. प्रा. डॉ. मुंबरकर म्हणाले की, नाथ पै यांच्या सर्वोदयी विचारसरणीवर आपली संस्था कार्यरत असून तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या पोटापाण्याची सोय व्हावी, यासाठी संस्थेचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. समाजातील दात्यांनीही आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले. म्हणूनच आपण एक आदर्श संस्था उभी करू शकलो, असेही डॉ. मुंबरकर म्हणाले. सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संस्कारामुळे आपल्याला चांगलली वक्तृत्व शैली मिळते. ज्याद्वारे आपण जग जिंकण्याची कला अवगत करू शकतो. बॅ. नाथ पै यांसारखे वकृत्व असलेली मंडळी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठीचा निरंतर ध्यास लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष कमलताई परुळेकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या जीवनातील विविध पैलूंवर भाष्य केले व त्यांच्या स्मृतींचा जागर केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅ. नाथ पै व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव सातपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षिका कोकरे यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका पिंगुळकर यांनी केले. आभार पावसकर यांनी मानलेत. यावेळी पत्रकार अजय सावंत, शाळेतील शिक्षक श्री. राठोड, श्री.मठकर आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशालेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
