खोट्या आरोपांना कायदेशीररित्या उत्तर देऊ;सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने दिला इशारा
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने कोरोना महामारीच्या काळामध्येही आपले काम चालू ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना पगार चालू ठेवला. त्याबाबत कुठल्याही कर्मचाऱ्यांची कुठलीही तक्रार नसताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप जे लोक करत आहेत ते बिनबुडाचे असून हे बिनबुडाचे आरोप कदापि सहन केले जाणार नाहीत असा इशारा देतानाच सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आरोप करणाऱ्या लोकांनी पुरावे देऊन ते आरोप सिद्ध करावेत असे आव्हान त्यांनी दिले आहे.
मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत मालवण पंचायत समितीचे गटनेते आणि माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी किर्लोस कृषी केंद्रात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता आज यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने प्रसिद्धी पत्रक देऊन कार्याबाबत भूमिका स्पष्ट केली प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग (केव्हीके) हे शेतकऱ्यांच्या मागणी वरून माजी खासदार ब्रिगेडीयर सुधिर सावंत यांनी किर्लोस येथे स्थापन केले व त्याचे काम सुरळीत चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचा कृषी विज्ञान केंद्र एक भाग आहे. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देण्याचे काम करते. त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नती साठी उपक्रम राबविते.
त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. नव नवीन तंत्रज्ञान सिंधुदुर्गात आणण्यात आले, त्यात भुईमूग, भात, नाचणी चवळी, कुळीथ, मुग, मका, सुर्यफुल, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, भाजीपाला लागवड, फळ प्रक्रिया व आंबा महोत्सव सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र काम करते. त्यासाठी वार्षिक कृती आराखडा बनवण्यात येतो. कृषी विद्यापीठाकडून व भारतीय कृषि परिषद यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच कृषी प्रतिष्ठानने अनेक उपक्रम हातात घेतले आहेत. समृद्ध आणि आनंदी गाव योजना, ही मग महाराष्ट्र सरकार ने सुद्धा कृषि विज्ञान केंद्रा कडून घेऊन राज्यभर लागू केली. या योजनेचे जनक ब्रिगेडियर सुधिर सावंत आहेत. या जिल्ह्यात पहिली नैसर्गिक शेतीची संकल्पना त्यांनी मांडली. अनेक शिबिरे, प्रशिक्षणे, प्रात्याक्षिके, विस्तार कार्यक्रम घेण्यात आले व गेली पाच वर्ष संशोधन करून नैसर्गिक शेतीचे प्रसार पूर्ण महाराष्ट्रात व बाजूच्या राज्यात करण्यात आला. केंद्र सरकारने हा प्रकल्प स्विकारला. यावर्षी याचा प्रसार करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने देखील घेतला आहे. कृषि प्रतिष्ठान व केव्हीके यांनी हा कार्यक्रम सर्व देशांमध्ये प्रसारित करण्यासाठी नैसर्गिक शेतीवर राष्ट्रीय संघटना बनवली आहे असे नमूद करून किर्लोस कृषी विज्ञान केंद्रावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यापालिकडे किर्लोस पंचक्रोशीत काय रोजगार निर्मिती केली हे जनतेला स्पस्ट करावे. कोणाला तक्रार करायची झाली तर त्यांनी संचालक मंडळाकडे तक्रार करायची असते व चौकशी करायची असते तसे न करता केवळ नाहक बदनामी करण्यासाठी राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन जे आरोप करत आहेत त्यांना कोणी जुमानत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान अनेक कार्यक्रम घेत आहे, त्याची माहिती घ्यावी. जमीन देण्यासाठी अनेक गावांमध्ये लोक तयार होते. पण किर्लोस गावचे शेतकरी प्रगतिशील आहेत या दृष्टिकोनातून केव्हीके किर्लोस येथे उभारण्यात आले. कृषि महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन देण्याचा नियम विद्यापीठाचा आहे. केव्ही के साठी पन्नास एकर जमीन असणे गरजेचे होते त्याप्रमाणे किर्लॉस गावात केव्हीके उभारण्यात आले. तद्नंतर महाराष्ट्रातील पहिले विना अनुदानित कृषि महाविद्यालय माजी खासदार सुधिर सावंत यांनी मंजूर करून आणले. जिल्ह्यात कृषि शिक्षणाचे एक मोठे दालन त्यांनी उभे केले. या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ओरस येथे महाविद्यालय उभारण्यास सांगितले व त्यासाठी जमीन सुद्धा देऊ केली म्हणून ओरस येथे विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी महाविद्यालय उभारण्यात आले. उगाच बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या विकासासाठी लोकांनी काम केले पाहिजे. आरोप करणाऱ्याना कृषि महाविध्यालय आणि कृषि विज्ञान केंद्र यामध्ये काय फरक आहे याच साध ज्ञान नाही. आरोप करणाऱ्या लोकांनी पुरावे देऊन सिद्ध करणे आवश्यक आहे. या खोट्या आरोपांना उत्तर कायदेशीर रित्या देण्यात येईल असेही म्हटले आहे
