मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत
*💫सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा १६ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. वेतोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २००४ सालापासून सुरूवात करण्यात आले होते. त्यापासून दरवर्षी मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यंदाचे वर्धापनदिनाचे १६ वे वर्ष आहे. वर्धापनदिनानिमित्त सकाळी श्री देव वेतोबा देवावर ब्राम्हणांच्या साक्षीने अभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिरातील पूर्वी देवी, तसेच इतर मुर्त्यांवरही अभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिरातील देवाची तरंगकाठी व पालखीचेही पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत वेतोबा देवाची महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला. देवस्थानच्या वर्धादिनानिमित्त दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. वर्धापनदिनानिमित्त काही भाविकांनी देवाला केळी, नारळ ठेऊन नवसफेड केली. सायंकाळी ग्रामस्थांची भजने तसेच किर्तन पार पाडले. रात्री मंदिराभोवती तरंसहीत भव्य पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीनंमर नेरूर येथील कलेश्वर दशातवार मंडळाने ‘कृमुरासुर’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला. मळेवाड परिसरातील भाविकांनी शासनाचे नियम पाळून श्री देव वेतोबाच्या दर्शनाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.
