महिलांना मिळालेले नैसर्गिक गुणधर्म म्हणजे ईश्वरी देणगी

डॉ. शिवानी गवंडे यांचे प्रतिपादन;आरपीडीमध्ये ‘मासिकपाळी व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शन

सावंतवाडी ता.०६ : सृजनांचा गुणधर्म ईश्वराने स्त्रियांना दिला आहे. महिलांना मिळालेले नैसर्गिक गुणधर्म म्हणजे ईश्वरी देणगी असून आयुर्वेदानुसार किशोरवयीन मुलींनी आहार, व्यायाम, वर्तन, विचार या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण हा काळ सुवर्णकाळ असतो‌, असे प्रतिपादन डॉ. शिवानी गवंडे यांनी येथे केले.

शासनाने घोषित केलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या विशेष अभियानांतर्गत येथील आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात ‘मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र’ या विषयावर डॉ. गवंडे यांचे विशेष व्याख्यान झाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गवंडे म्हणाल्या, आयुष्यात बदल पाहिजे. पण हा बदल आरोग्याला धोका निर्माण करणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर स्त्रियांनी चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायला शिकले पाहिजे. आपल्याला सुंदर असे आयुष्य एकदाच मिळते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अनाथांची माय, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दिवंगत सिंधुताई सपकाळ यांना आरपीडी परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विधिता केंकरे हिने आपल्या सुमधुर आवाजात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रा. जगदीश धोंड मार्गदर्शन करताना म्हणाले, किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी अशी शास्त्रीय माहिती आणि जनजागृती ही काळाची गरज आहे. सर्व स्तरावरील शालेय विद्यार्थिनींना अशा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनात असलेल्या शंका तसेच अंधश्रद्धांचे निराकरण होऊन त्यांना आपल्या मानवी जीवनातील नैसर्गिक शारीरिक बदलांची जाणीव होईल आणि त्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करतील, असे सांगून त्यांनी विद्यालयाच्या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रशालेच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी स्त्री वर्गाला जागृत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संतोष पाथरवट, प्रा. वामन ठाकूर, प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. प्रज्वला कुबल, प्रा. सागर सावंत, प्रा. मिलिंद कासार व सर्व विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. विजया सावंत यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. पुनम वाडकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी विधिता केंकरे हिने केले. आभार प्रा. रुपाली नार्वेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page