नेतर्डेत-लिंगाचामळा येथील घटना : वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात
*⚡बांदा ता.०५-:* नेतर्डे – लिंगाचामळा येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे बचावासाठी पळताना सांबर सुमारे २० फूट खोल विहिरीत पडले. स्थानिक शेतकऱ्यांना विहिरीत पडलेले सांबर निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सांबराला यशस्वीपणे विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदर बचाव मोहीम सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष देसाई, संतोष मोरे, शशिकांत देसाई यांच्या पथकाने केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकर्यांनी आपल्या विहिरींना कठडे बांधून घ्यावेत किंवा त्यावर लोखंडी जाळी बसवावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.
