*⚡सावंतवाडी ता.०५-: ‘मॅंगोनेट’वर आंबा बागांची नोंदणी करण्यासंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन (वेबिनार) ऑनलाईन पद्धतीने उद्या, गुरुवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त आंबा बागायतदारानी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा निर्यात करण्यासाठी मॅंगोनेट प्रमाणपत्र गरजेचं आहे. अपेडाच्या साईटवर निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत केले जाते. सर्वसाधारणपणे डिसेंबर ते मार्च अखेर वेबसाईटवर बागांची नोंदणी करता येते. या नोंदणीची प्रक्रिया, त्याचे फायदे, कोणकोणती कागदपत्रे लागतात याबाबत कृषि आयुक्तालय, पुणे येथील श्री गोविंद हांडे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सावंतवाडीचे उपक्रमशील कृषी सहाय्यक यशवंत गव्हाणे आहेत. तर सुखदेव जमधडे (अहमदनगर), प्रदीप भोर (नाशिक) हे हा कार्यक्रम ‘झूम’बरोबरच सहाय्यक कृषि अधिकारी फेसबूक पेजवर व ‘द फार्मबूक यु ट्युब’वरही लाईव करण्यासाठी सोबत असणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त आंबा बागायदारानी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
