संजय जाधव यांना ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव’ राज्य पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील मडुरा येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ३ चे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय जाधव यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग उत्तमरीतीने केल्याबद्दल त्यांना ‘इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला, साहित्य व सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन २०२१’ मध्ये ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘अण्णा’ माधव अभ्यकंर यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

जाधव यांना आतापर्यंत श्याम रंजन बहुउद्देशीय फाउंडेशन, मुंबईचा ‘लक्षवेध’ पुरस्कार, राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन इचलकरंजी-कोल्हापूर यांचा ‘महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार’, शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने देण्यात येणारा ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय मांगेली-दोडामार्ग यांच्यावतीने २०११ साली आदर्श शिक्षक पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

तसेच त्यांनी ‘शोध अंतर्मनाचा’ हे पुस्तक लिहिलेले असून त्यांचे शोधनिबंध आणि कृती संशोधनही अनेक वेळा प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत संजय जाधव यांनी शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या ज्ञानाचा सामाजिक क्षेत्रात त्यांनी उत्तमरित्या वापर केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page