राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवारी अर्ज अवैध…
वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या छाननीत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भुईसपाट झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवारी अर्ज व राष्ट्रीय काँग्रेसचा एक उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. उमेदवारी अर्जाला पक्षाचे एबी फॉर्म व बँक पासबुक झेरॉक्स न जोडल्यामुळे हे अर्ज अवैध ठरले आहेत. चार जागांसाठी एकूण 19 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 8 उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. तर 11 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 10 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
येथील नगरपंचायतच्या दाललात छाननी प्रक्रिया पार पडली. प्रभाग क्रमांक -3 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुरेखा रमेश चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरला आहे. पक्षाचा ओरिजिनल एबी फॉर्म न जोडल्यामुळे तसेच बँक पासबुक झेरॉक्स न जोडल्यामुळे हा अर्ज बाद झाला आहे. तर भाजपाचे दुय्यम उमेदवार रेश्मा तुकाराम बावधाने यांचा अर्ज बाद झाला आहे. प्रभाग क्रमांक – 5 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सुवर्णा अशोक मोहिते यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यांनीही एबी फॉर्म न जोडल्यामुळे अर्ज बाद झाला आहे. तर भाजपाचे दुय्यम उमेदवार उषा पंडित चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरला आहे. प्रभाग क्रमांक – 15 मध्ये भाजपाचे दुय्यम उमेदवार नारायण शांताराम मांजरेकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तर सेनेचे दुय्यम उमेदवार सिद्धेश हरिचंद्र रावराणे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तसेच प्रभाग क्रमांक – 16 मध्ये भाजपाचे दुय्यम उमेदवार दत्तात्रय श्रीधर इंदप यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तर राष्ट्रवादीचे सुरेश वामन करकोटे यांनी पक्षाचा एबी फॉर्म व बँक पासबुक न जोडल्यामुळे अर्ज बाद झाला आहे. या चार जागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या चार जागा मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन जागेवर उमेदवारी अर्ज भरले होते. त्यांचे सर्व अर्ज बाद झाल्याने हे दोन्ही पक्ष निवडणूक प्रक्रियेतून बाहेर गेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब भुसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत छाननी पार पडली.
