प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फेसबुक पेजवर ऑनलाईन व्याख्यान
*⚡सावंतवाडी ता.०४-: आजच्या एकविसाव्या शतकात महिलांनी वैयक्तिक प्रगतीची गरुड झेप घेतली आहे. महिला अनेक बाबतीत स्वयंभू झाल्या असून यामागे सावित्रीबाई फुले यांचा प्रचंड त्याग आणि बलिदानाचे योगदान आहे. हा त्याग समजून घेत महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक घरातून सुरुवात व्हायला हवी, असे मत प्रा. रुपेश पाटील यांनी ऑनलाईन व्याख्यानातून व्यक्त केले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ‘सहाय्यक कृषी अधिकारी’ ह्या फेसबुक पेजवर प्रा. रुपेश पाटील यांचे ‘सावित्रीबाई फुले आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रा. पाटील यांनी महिला सक्षमीकरणाची आजच्या काळातील गरज विषद केली. ते पुढे म्हणाले, अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात महिलांसाठी ‘चूल आणि मूल’ एवढीच संकल्पना अस्तित्वात होती. त्या काळात सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षातून महिला सक्षमीकरणाची पहिली ज्योत महाराष्ट्राच्या मातीत पेटवली गेली. लोकांचा दगड, गोटे आणि शेणाचा मारा सहन करीत सावित्रीबाईंनी प्रचंड त्यागातून स्त्री शिक्षणाची गंगोत्री महिलांसाठी आणली. सावित्रीबाईंच्या या त्यागामुळे आज महिला प्रगतीपथावर असून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वोच्चपदापर्यंत मजल मारली आहे. याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. तत्कालीन परिस्थितीतून महिला सक्षमीकरणासाठी ज्या यातना सावित्रीबाईंनी झेलल्या, त्यातूनच प्रेरणा घेत आजच्या काळातील महिला खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाच्या दिशेने जात आहेत.
‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन करुन सावित्रीबाईंनी स्त्रीभ्रूणहत्या थांबविली. त्या काळात ‘केशवपन’ ही अनिष्ठ प्रथा अस्तित्वात असताना न्हावी बांधवांना एकत्रित करत “आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो, हे मोठे पाप आहे..!” याची जाणीव त्यांना करून दिली आणि ‘केशवपन’सारख्या प्रथा बंद केल्या. आज देखील सावित्रीबाईंच्या आदर्शांवर चालणे गरजेचे आहे. पण त्यासाठी प्रत्येक पुरुषाने ‘जोतिबा’ होणेही तेवढेच आवश्यक आहे. घराघरातील सावित्रीना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. तरच महिला सक्षमीकरण शक्य आहे, असेही प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासन सेवेत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून कृषी सहाय्यक फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रा. पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानाचे समन्वयक व सावंतवाडीचे उपक्रमशील सहाय्यक कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
