पर्ससीन मच्छीमारांची भूमिका; साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
*⚡मालवण ता.०२-:* राज्य सरकारने पारीत केलेल्या नव्या सुधारित मच्छीमारी कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशनच्या वतीने मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालया समोर सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छीमारांनी कालपासून छेडलेले साखळी उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते.
आमची लढाई पर्ससीन धारक मच्छिमारांच्या न्याय हक्कांसाठी आहे. पर्ससीनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजत आहे. एनसिडीसीच्या माध्यमातून पर्ससीन नेट धारक ट्रॉलर उभारणीसाठी शासनाने मच्छीमाराना कर्ज व अनुदान द्यावे. सहकारातून समृद्धीकडे या तत्वातून पर्ससीन मासेमारीस चालना मिळावी, अशी मागणी यावेळी पर्ससीन मच्छीमारांच्यावतीने कृष्णनाथ तांडेल यांनी केली. आज दुसऱ्या दिवशी पर्ससीन मच्छीमारांचे आंदोलन शांततेत व लोकशाही पद्धतीने सुरू होते. यावेळी सहदेव बापर्डेकर, सतीश आचरेकर, गोपीनाथ तांडेल, अशोक सारंग, संतोष शेलटकर, रेहान शेख, मुजफ्फर मुजावर यासह वेंगुर्ला, देवगड, मालवण येथील पर्ससीन धारक मच्छिमार उपस्थित होते. यावेळी बोलताना कृष्णनाथ तांडेल म्हणाले, मच्छीमाराना आर्थिक प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नव्या दृष्टीने नवीन संकल्प करावा. पर्ससीन धारकांना नवीन परवाने देण्यात यावे.
दिलेल्या परवान्यांचे नूतनीकरण व्हावे. एनसिडीसीच्या माध्यमातून पर्ससीन नेट धारक ट्रॉलर उभारणीसाठी शासनाने मच्छीमाराना कर्ज व अनुदान द्यावे. सहकार तत्वावर एकत्र येत मालवण तालुक्यातील सर्जेकोट-मिर्याबांदा येथे दोन गटांनी पर्ससीन मासेमारी व्यवसाय सुरू केला आहे. एका गटात १८ असे दोन गटात ३६ जण एकत्र येऊन सर्वसामान्य कुटुंबातील मच्छिमारांनी किमान भांडवल गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला आहे. पर्ससीन मासेमारी ही कमीत कमी प्रदूषकारी व फायदेशीर मासेमारी आहे. हे पटल्याने आणखीही समूह या मासेमारी व्यवसायात उतरत आहेत. एनसिडीसी पद्धतीने कर्ज व अनुदानही शासनाने या मच्छीमाराना द्यावे, असेही कृष्णानाथ तांडेल म्हणाले. पर्ससीन जाळे विज्ञाननिष्ठ असुन कमीतकमी प्रदूषणकारी आहे. तसेच मच्छीमारांसाठी फायदेशीर असल्याने मासेमारीत उर्जितावस्था येणार आहे. याचा विचार केंद्र शासन व राज्य शासनाने करावा. ज्या प्रमाणे १९७८ सालापासून एनसिडीसीने यांत्रिक ट्रॉलर दिले त्या प्रमाणे आता पर्ससीन नेट धारक ट्रॉलर उभारणी करावी. एनसिडीसी ने पॅटर्न निर्माण करावा. ४० टक्के लाभार्थी भांडवल कर्ज रक्कम व ६० टक्के रक्कम सबसिडी रुपात द्यावी. पर्ससीन मासेमारीतून मिळणाऱ्या रोजगाराचा विचार करून शासनाने पर्ससीन मासेमारीचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अर्थ साहाय्य देऊन खंबीर पाठिंबा द्यावा. पर्ससीन मासेमारीवर असलेले निर्बंध राज्य शासनाने शिथिल करावे. अशी भूमिकाही कृष्णानाथ तांडेल यांनी मांडली. परराज्यातील हायस्पीड व अन्य मासेमारी बोटी जे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसून मासळीची लूट करतात. वादळ परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विजयदुर्ग बंदरात मोठ्या संख्येने परराज्यातील मासेमारी बोटी आश्रय घेतात. यावरून परराज्यातील किती मासेमारी बोटी महाराष्ट्र, सिंधुदुर्ग हद्दीत मासेमारीस येतात हे स्पष्ट होते, असे सांगत परराज्यातील मासेमारी बोटीं विरोधी भूमिकाही पर्ससीन मच्छिमारांनी यावेळी स्पष्ट केली. साखळी उपोषणकर्ते पर्ससीन मच्छिमार यांची रविवारी मेजर माजी प्राचार्य डॉ. श्रीपाद गिरसागर यांनी भेट घेतली. मासेमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार व उत्पन्न देण्याची क्षमता आहे. मासेमारी विकसित झाली पाहिजे, यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा. अशी भूमिकाही डॉ. गिरसागर यांनी स्पष्ट केली.
